मुलीवर बलात्कार करण्यासाठी प्रियकराला मदत केली, आईला 40 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केरळमधील तिरूवनंतपुरममध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका महिलेने तिच्या मुलीवर प्रियकराला बलात्कार करण्यास मदत केली. तिच्या या गंभीर गुन्ह्याबद्दल 40 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच या प्रकरणी महिलेला 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सदर घटना मार्च 2018 ते सप्टेंबर 2019 दरम्यान घडली होती. दोषी महिला तिच्या मनोरूग्ण पतीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर ती शिशुपालन नावाच्या मित्रासोबत राहायला लागली होती. या महिलेला एक मुलगी असून ती त्यावेळी 7 वर्षांची होती. एकत्र राहात असताना या महिलेच्या प्रियकराने चिमुरडीवर अनेकदा बलात्कार केला होता. या असह्य अत्याचारांमुळे ही मुलगी जखमीही झाली होती. शिशुपालनने या मुलीच्या 11 वर्षांच्या सावत्र बहिणीवरही बलात्कार केला होता. दोषी महिला शिशुपालन याला रोखण्याऐवजी त्याला हे करण्यासाठी मदत करत होती. 7 वर्षीय पीडितेची सावत्र बहीण अत्याचाराला कंटाळून आपल्या आजीकडे पळून गेली होती.  तिने हा सगळा प्रकार तिचया आजीला सांगितला होता.

घटनेची माहिती मिळताच आजीने पोलिसांत तक्रार केली , ज्यानंतर या दोन्ही मुलींना बालसुधार गृहात पाठवण्यात आले. या अल्पवयीन मुलींना अत्याचार झाल्याचे उघड न करण्याची धमकी दिल्याने दोन्ही मुली घाबरल्या होत्या. मात्र त्यांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या मुलींनी सांगितले की त्यांनी शिशुपालन आपल्यावर बलात्कार करत असल्याचे आईला सांगितले होते, मात्र आईने त्याकडे दुर्लक्ष केले होते.केरळच्या विशेष न्यायालयाने या मुलींच्या आईला शिक्षा देताना म्हटले की ही महिला ‘माता’ या नात्याला कलंक लावणारी असून तिला कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.