महिलांचा आशिया चषक दंबुलात, पुरूषांच्या टी-20 वर्ल्ड कपनंतर रंगणार आशियाई द्वंद्व

आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) महिला आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले असून ही स्पर्धा येत्या 19 ते 28 जुलैदरम्यान श्रीलंकेतील दंबुला शहरात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतही हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर सर्वांचे लक्ष असून हा हायव्होल्टेज सामना 21 जुलैला रंगणार आहे. या स्पर्धेनंतर सप्टेंबर महिन्यात बांगलादेशमध्ये महिला टी-20 वर्ल्ड कपही खेळविला जाणार आहे.

गेल्या आशिया कप (2022) स्पर्धेत एकूण 7 देश सहभागी झाले होते आणि प्रत्येक संघ 6 सामने खेळला होता. यंदा संघाचा आकडा एकाने वाढला असून चार-चार संघाचे दोन गट पाडण्यात आले आहेत. ‘अ’ गटात हिंदुस्थानसह पाकिस्तान, यूएई आणि नेपाळ या संघाचा समावेश करण्यात आला आहे तर ‘ब’ गटात श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया आणि थायलंड हे संघ भिडतील.

हिंदुस्थानची सलामी नेपाळविरुद्ध

आशिया चषकाचा सलामीचा सामना हिंदुस्थान आणि नेपाळ यांच्यात 19 जुलै रोजी खेळविला जाणार आहे. त्याच दिवशी पाकिस्तानचा सामना यूएईशी भिडेल. दोन्ही गटांतील अव्वल 2-2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. उपांत्य फेरीच्या दोन्ही लढती 26 जुलै तर अंतिम सामना 28 जुलैला खेळविला जाईल.

महिला आशिया चषकाचे वेळापत्रक

19 जुलै    –     पाकिस्तान विरुद्ध नेपाळ

19 जुलै    –     हिंदुस्थान वि यूएई

20 जुलै    –     मलेशिया विरुद्ध थायलंड

20 जुलै    –     श्रीलंका विरुद्ध बांगलादेश

21 जुलै    –     नेपाळ विरुद्ध यूएई

21 जुलै    –     हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान

22 जुलै    –     श्रीलंका विरुद्ध मलेशिया

22 जुलै    –     बांगलादेश विरुद्ध थायलंड

23 जुलै    –     पाकिस्तान विरुद्ध यूएई

23 जुलै    –     हिंदुस्थान  विरुद्ध नेपाळ

24 जुलै    –     बांगलादेश विरुद्ध मलेशिया

24 जुलै    –     श्रीलंका विरुद्ध थायलंड

26 जुलै    –     दोन्ही उपांत्य लढती

28 जुलै    –     अंतिम सामना