मोदी सरकारच्या काळात महिला असुरक्षित; धक्कादायक आकडेवारी उघड, तीन वर्षांत 10 लाख महिला बेपत्ता

मोदी सरकारच्या कार्यकाळात देशात महिला असुरक्षित असल्याचे अधोरेखित करणारा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. 2019, 2020 आणि 2021 या तीन वर्षांत देशातून तब्बल 10 लाख महिला बेपत्ता झाल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील महिलांची संख्या सर्वाधिक आहे. 

मणिपूरमध्ये महिला हिंसाचाराने परिसीमा गाठलेली असताना महिलांबाबत एनसीआरबीच्या आकडेवारीने देशातील भयावह स्थिती समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानेच एनसीआरबीची ही आकडेवारी जारी केली आहे. 

महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक 

महाराष्ट्रातून 2019 मध्ये 63 हजार 167, 2020 मध्ये 58 हजार 735 तर 2021 मध्ये 56 हजार 498 महिला बेपत्ता झाल्या आहेत. मध्य प्रदेशात 2019 मध्ये 52 हजार 119, 2020 मध्ये 52 हजार 357 तर 2021 मध्ये 55 हजार 704 महिला बेपत्ता झाल्या. 

  • 2019 ते 2021 या तीन वर्षांत देशातून 10 लाख 61 हजार 648 महिला बेपत्ता झाल्या. त्यात 2021 या एका वर्षात  18 वर्षांवरील 3 लाख 75 हजार 58 महिला, तर 18 वर्षांखालील 90 हजार 113 मुली बेपत्ता झाल्या. 

केंद्राचे राज्यांकडे बोट! 

महिलांशी संबंधित गुह्यांच्या तपास करण्याची, त्याचा छडा लावण्याची, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे, असे नमूद करत केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांकडे बोट दाखवले आहे.