वर्ल्ड टेबल टेनिस स्टार कंटेंडर गोवा 2024; हिंदुस्थानच्या श्रीजाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, मनिकाचा पराभव

जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेला फेलिक्स आणि अव्वल मानांकित युबिन यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीत अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे

हिंदुस्थानी खेळाडू श्रीजा अकुलाने वर्ल्ड टेबल टेनिस स्टार कंटेंडर गोवा 2024 ( World Table Tennis (WTT) Star Contender Goa 2024) स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मनिका बत्रा आणि अर्चना कामत यांना शनिवारी गोव्यातील मापुसा येथील पेडेम इनडोअर स्टेडियमवर आपापल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

हैदराबादच्या अकुलाने सकारात्कम सुरुवात करताना जागतिक क्रमवारीत उच्च रँकिंग असलेल्या हाँगकाँग डू होई केम (WR 36) चा पराभव केला. पहिल्या गेममध्ये चुरशीचा विजय मिळवल्यानंतर तिला दुसऱ्या गेममध्ये हार मानावी लागली. पण, जागतिक क्रमवारीत 66 व्या स्थानावर असलेल्या खेळाडूने पुढील दोन गेमवर पूर्ण नियंत्रण ठेवले आणि सामना 3-1 ( 12-10, 8-11, 11-8, 11-8 ) ने जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

“हा सामना जिंकून मला खरोखर आनंद झाला आहे. 2021 मध्ये मी याच प्रतिस्पर्धीकडून पराभूत झाले होते, त्यामुळे या स्पर्धेत तिच्याविरुद्धचा सामना जिंकणे खरोखरच खूप छान वाटत आहे. मी माझ्या योजना अचूकपणे अंमलात आणू शकले आणि नंतरही मी स्वतःला प्रेरित केले. ती खरोखरच आक्रमक होती आणि मी चेंडू टेबलवर ठेवण्यावर आणि आक्रमणासाठी योग्य चेंडू निवडण्यावर लक्ष केंद्रित केले. मी आगामी सामन्यासाठी देखील चांगली तयारी करेन,” असे विजयानंतर अकुला म्हणाली.

टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) च्या मार्गदर्शनाखाली स्तूपा स्पोर्ट्स अ‍ॅनालिटिक्स आणि अल्टिमेट टेबल टेनिस यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दुसरीकडे, भारताची अव्वल मानांकित मनिका बत्राला (WR 38) जागतिक क्रमवारीत 13 व्या क्रमांकावर असलेल्या मोनॅकोच्या झिओक्सिन यांगविरुद्ध 1-3 ( 11-9, 11-13, 7-11, 9-11) असा पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीच्या अन्य उपउपांत्यपूर्व फेरीत बंगळुरूच्या कामतचा दक्षिण कोरियाच्या जिओन जिहे हिने 1-3 ( 11-13, 11-9, 6-11, 4-11) असा पराभव केला.

जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या दक्षिण कोरियाच्या शिन युबिनने आपला सकारात्मक फॉर्म कायम ठेवत स्वीडनच्या क्रिस्टीना कॉलबर्गचा 3-1 ( 11-5, 11-6, 10-12, 11-6) असा पराभव केला, तर चायनीज तैपेईच्या चेंग आय-चिंगने ( WR 18) दक्षिण कोरियाच्या यांग हा युनचा 3-0 ( 11-8, 11-9, 11-9) ने पराभव केला.

पुरुष एकेरीच्या अंतिम 16च्या फेरीत जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या फेलिक्स लेब्रुनने आपला चमकदार फॉर्म वाढवत स्वीडनच्या रुल्स मोरेगार्डविरुद्ध 3-0 ( 11-3, 12-10, 11-9) असा सहज विजय नोंदवला. मात्र, त्याचा भाऊ ॲलेक्सिस लेब्रुनला जागतिक क्रमवारीत 14व्या क्रमांकावर असलेल्या नायजेरियाच्या क्वाद्री अरुणाविरुद्ध 1-3 ( 8-11, 11-5, 10-12, 8-11) अशा पराभवाचा सामना करावा लागला.

सहा वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या जर्मनीच्या दिमित्रीज ओव्हचारोव्हने सुरेख फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डचा 3-1 ( 11-5, 8-11, 17-15, 11-8) असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

सेमीफायनल आणि फायनल रविवारी खेळल्या जातील आणि चाहत्यांना BookMyShow वर तिकीट बुक करून जागतिक दर्जाच्या खेळाचा आनंद घेता येईल. सोनी स्पोर्ट्स 2 एसडी आणि सोनी स्पोर्ट्स टेन 2 एचडी या चॅनेलवर आणि Sony Liv app थेट प्रक्षेपण पाहू शकतात.