…तर मोदी-शहांना पण अटक करणार का? केजरीवालांवरील कारवाईवरून नेटकऱ्यांचा निशाणा

कथित मद्य घोटाळ्याचा आरोप करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली आहे. ईडी-सीबीआय सारख्या संस्थांच्या आडून चाललेल्या भाजपच्या राजकारणावर आता नेटकऱ्यांनीही निशाणा साधायला सुरुवात केली आहे. एक्स पोस्टवर ईडीच्या कारवाईची खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट सध्या वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत.

एका ज्येष्ठ पत्रकाराच्या पॅरडी एक्स पोस्टवर प्रकाशित झालेली पोस्ट भलतीच व्हायरल होत आहे. त्यात अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयासमोरील हजेरीचा प्रसंग लिहिण्यात आला असून ईडीच्या युक्तिवादांच्या फोलपणावर चिमटे काढण्यात आले आहेत.

कोर्टातील सुनावणीचा एक काल्पनिक प्रसंग रचून त्यात एक रोखठोक सवाल या पोस्टमध्ये विचारण्यात आला आहे. ईडीकडून असा युक्तिवाद करण्यात येतो की त्यांच्याकडे केजरीवाल यांच्या विरोधात जबाब आहेत, म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यावर केजरीवाल यांच्याकडून मोदी शहांचं नाव जबाब म्हणून घेतल्यास त्यांनाही अटक करण्यात येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच, जर अशा प्रकारचं अडाणी सरकार पुन्हा निवडून आलं तर संविधानाचा अपमान करेल आणि न्यायालय बंद करेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.