अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. न्या. अनिल किलोर आणि न्या. जवळकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.

भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अकोला पश्चिम विधानसभेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. 28 मार्चला अधिसूचना जारी होऊन 26 एप्रिलला मतदान तर 4 जून रोजी मतमोजणी असा हा निवडणूक कार्यक्रम होता. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला असताना केवळ तीन महिन्यांसाठी पैशांचा अपव्यय कशासाठी असा प्रश्न उपस्थित करून या निवडणूकीला विरोध झाला होता. निवडणुकीला आव्हान देणारी याचिका शिवमकुमार दुबे यांनी दाखल केली होती.

न्या. अनिल किलोर आणि न्या. जवळकर यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली. याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने याचिकाकर्त्याचा युक्तिवाद ग्राह्य धरून ही निवडणूक रद्द करण्याचे आदेश दिले.