पूनम महाजन यांचा पत्ता कट; उज्ज्वल निकम यांना उत्तर-मध्य मुंबईतून भाजपची उमेदवारी जाहीर

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा खटला लढणारे वकील उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. भाजपमध्ये आणखी एका निष्ठावंताला डावलण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात आता महाविकास आघाडीच्या उमेदवार काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि उज्जल निकम यांच्या लढत होणार आहे.

पूनम महाजन यांचा पत्ता कट होणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू होती. आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपने उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे भाजपमधील निष्ठावंत असलेल्या पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला आहे. भाजपने गेल्या अनेक दिवसांपासून या जागेवरील उमेदवारी राखून ठेवली होती.

Lok Sabha Election 2024 : भाजपच्या गोयल यांना मासळीचा वास सोसवेना; कार्यकर्त्यांची महिला पत्रकाराला धमकी

 

पूनम महाजन या भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. महाराष्ट्रात भाजपचा प्रसार करणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचं नाव प्रामुख्याने घेतलं होतं. प्रमोद महाजन यांचे मे 2006 मध्ये निधन झाले. त्यानंतर जून 2014 मध्ये गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. गोपीनाथ मुंडे यांची कन्या भाजपच्या निष्ठावंत नेत्या पंकजा मुंडे यांनी बऱ्याचदा पक्षातील आपली घुसमट जाहीरपणे मांडली होती. अनेकदा संधी असूनही त्यांना डावललं गेलं होतं. आता अशाच प्रकारे पूनम महाजन यांचा पत्ता कटून भाजपने त्यांना आणखी एका निष्ठावंताला डावलल्याची जोरदार चर्चा आहे. कारण पूनम महाजन या एकदा नव्हे तर दोन वेळा या मतदारसंघातून 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मतांनी जिंकून आल्या होत्या.