Lok Sabha Election 2024 : भाजपच्या गोयल यांना मासळीचा वास सोसवेना; कार्यकर्त्यांची महिला पत्रकाराला धमकी

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांच्या विरोधात ‘गोयल यांना सोसवेना मासळीचा वास’ ही बातमी दैनिक नवाकाळमध्ये प्रसिध्द झाली होती. त्यामुळे पराभवाच्या भीतीने बिथरलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी महिला पत्रकाराला धमकी दिली आहे. या धमकीचा पत्रकारांच्या संघटना व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निषेध केला आहे.

या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे बोरिवली (प) येथिल बाभई व वझिरा येथे प्रचार करताना माशांचा वास सहन न झाल्याने त्यांनी नाकाला रूमाल लावला होता. या घटेनेची बातमी नवाकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबई काँग्रेसने कांदिवली येथे पियुष गोयल यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.

या संदर्भातली वृत्त प्रसिध्द झाल्याने भाजपचे कार्यकर्ते सोमवारी रात्री पत्रकार नेहा पुरव यांच्या बोरीवलीतील घरी गेले आणि पुन्हा मच्छिमारांची बातमी छापू नका अशी धमकी दिली. या धमकीचा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, प्रेस क्लब, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई हिदी पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. संबंधितांवर कडक कारवाईची मागणी पत्रकारांच्या संघटनांनी केली आहे.

काँग्रेसची अटकेची मागणी
महिला पत्रकाराला धमकी देणाऱ्या गुंडांना तातडीने अटक करण्याची मागणी काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, काँग्रेसचे मुख्य प्रवत्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. पत्रकारांना धमक्या देऊन पियुष गोयल आपला पराभव टाळू शकत नाहीत असा काँग्रेसने मारला आहे.