गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण एका मिनिटात फुल्ल, चाकरमान्यांच्या पदरी निराशाच

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया रेल्वेचे आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल्ल झाले. प्रतीक्षा यादी 500च्या पलिकडे गेल्यामुळे तिकिटे काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना ‘रिग्रेट’ असे दाखवण्यात येत आहे. तिकीट आरक्षणात मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार होत असून अवघ्या एका मिनिटात आरक्षण कसे फुल्ल होते, असा संतप्त सवाल चाकरमान्यांनी उपस्थित केला.

दरवर्षी गणेशोत्सवात मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात राहणारे हजारो चाकरमानी आपल्या कुटुंबकबिल्यासह कोकणात जातात. साधारण 120 दिवस आधीच कोकण रेल्वेच्या तिकीट बुकिंगला सुरुवात होते. यंदा बाप्पाचे आगमन 7 सप्टेंबर रोजी होत असून त्याआधीच्या तीन दिवसांचे म्हणजे 4 सप्टेंबरच्या प्रवासाचे आरक्षण मंगळवारी खुले झाले. मात्र अवघ्या एका मिनिटात आरक्षण फुल्ल झाले. सर्वसामान्य प्रवाशी सण-उत्सवाला गावी जातात. याचा फायदा घेत दलालांकडून मोठय़ा संख्येने तिकिटांचे आरक्षण करून चढय़ा दराने विक्री करण्याचे रॅकेट सुरू आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवातील रेल्वे तिकिटांचा काळाबाजार समोर आला होता.

दलालांवर कारवाईचा केवळ दिखावा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया रेल्वेचे आरक्षण अवघ्या काही सेपंदांत कसेकाय फुल्ल होते? याचा अर्थ गेल्या वर्षी दलालांवर कारवाईचा प्रशासनाने केवळ दिखावा केला. दरवर्षी 120 दिवस आधी कोकणात जाणाऱया रेल्वे तिकिटांचे बुपिंग करून तसेच कन्फर्म न झालेली तिकिटे रद्द करून रेल्वे भरमसाट कमाई करते. प्रतीक्षा यादीवर किती प्रवाशांना तिकिटे दिली जातात याची माहिती मी 2012 साली कोकण रेल्वेकडून माहिती अधिकारात मागवली. त्यावर आमच्याकडे अशा प्रकारची माहिती उपलब्ध नाही, असे उत्तर प्रशासनाने पाठवले. त्यामुळेच प्रतीक्षा यादीवर भरमसाट तिकीट दिली जातात, पण कन्फर्म तिकीट फक्त दलालांनाच दिली जातात, असा आरोप कोकण रेल्वे प्रवाशी संघटनेचे बळीराम राणे यांनी केला.