रेणुका शहाणे यांच्या भूमिकेला सुषमा अंधारेंचा पाठिंबा, चित्रा वाघांना हाणला सणसणीत टोला

मराठी भाषिकांना नोकरी नाकारणाऱ्यांची पाठराखण करणाऱ्यांना मत देऊ नका, अशी परखड राजकीय भूमिका घेणाऱ्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी पाठिंबा दिला आहे. पण, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांना पत्र लिहून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर अंधारे यांनी रेणुका शहाणे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला असून त्यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. तसंच, चित्रा वाघ यांना लेडी सोमय्या असं म्हणत सणसणीत टोलाही हाणला आहे.

मुंबईतील गिरगाव येथे मराठी “not welcome” म्हणणार्‍या आणि मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका, असं रेणुका शहाणे यांनी म्हटलं होतं. त्यावरून सोशल मीडियावर चर्चाही रंगल्या होत्या. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले होते. पण, अंधारे यांनी रेणुका शहाणे यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी रेणुका शहाणे यांना पत्र लिहिलं आहे.

या पत्रात अंधारे लिहितात की, प्रिय रेणुकाताई, नमस्कार… आपण प्रत्यक्षात कधी भेटलो नाहीय. परंतु तुमच्या हसतमुख अभिनयाची मी प्रचंड चाहती आहे. सुरभी मालिकेपासून ते रिटा सारख्या अनेक चरित्र चित्रपटातल्या आपल्या भूमिका या मानवी मनाचे विविध कंगोरे दाखवणाऱ्या आहेत. आपला सशक्त अभिनय बघताना आपल्या संवेदनशील मनाची आणि आपल्या प्रगल्भतेची सुद्धा जाणीव माझ्यासारख्या प्रेक्षकाला सातत्याने होत राहते. “मराठी पिपल आर नॉट वेलकम” या मुद्द्यावर आपण घेतलेली भूमिका प्रशंसनीय आहे. ज्या महाराष्ट्राच्या फिल्म इंडस्ट्रीने मराठीच नाही तर विविध प्रांतातून आलेल्या अनेक कलाकारांना कलेची दालनं नुसती खुली करून दिली नाही तर त्या सगळ्या जात धर्म आणि प्रांतांच्या कलाकारांना या मायानगरीने सामावून घेतलं. आदरातिथ्य केलं.. अनेकांच्या कित्येक पिढ्या खुशहाल झाल्या. त्या मायमराठी बद्दल या चंदेरी नगरातील आपल्यासारखी एक संवेदनशील अभिनेत्री अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन आपलं म्हणणं ठामपणे मांडते. यासाठी आपलं मनःपूर्वक अभिनंदन.. ताई आपण जितक्या ठामपणे भूमिका मांडली त्यानंतर त्यावर राजकीय किंतु परंतु करत निव्वळ आणि निव्वळ आपल्या अस्तित्वाची लढाई म्हणून आक्रस्ताळेपणा करणाऱ्या काही प्रतिक्रिया येतीलच. पण त्याकडे दुर्लक्ष करण्याइतकी प्रगल्भता आपल्याकडे आहे.हे वेगळे सांगायला नको. पण ज्यांनी आक्रस्ताळेपणा केला किंवा आपल्या हेतूविषयी शंका व्यक्त केली तीच माणसं कोविडच्या काळामध्ये जेव्हा माणूस माणसाला ओळखत नव्हता. रक्ताची नाती या महाभयंकर आजारापुढे कमकुवत ठरत होती. अशा काळात महाराष्ट्राच्या फक्त महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलं की सगळ्यात चांगलं काम हे महाराष्ट्र मुंबई विशेषता लोकसंख्येची सर्वाधिक घनता असणाऱ्या धारावी पॅटर्नमध्ये झालं. धारावी पॅटर्नमध्ये राहणारे लोक फक्त मराठी नाहीत. ते भारतभरातून धारावी मध्ये स्थायिक झालेले विविध जाती धर्माचे भाषेचे आणि प्रांताचे लोक आहेत ज्यांची काळजी कुटुंबप्रमुख म्हणून तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. पण हे अशा आक्रस्ताळ्या लोकांना कळणार नाही, असं अंधारे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

चित्रा वाघ यांचं नाव न घेता सणसणीत टोलाही अंधारे यांनी हाणला.. ‘पण निव्वळ इतरांना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी लेडी सोमय्या बनत जे गलिच्छ आरोप करणारे लोक आहेत ते आजही या प्रश्नाचे उत्तर देत नाही की, कोविडच्या काळामध्ये एकीकडे भाजपशासित राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये प्रेतं नदीवर तरंगत होती, गुजरात मध्ये प्रेतं रस्त्यावर जाळली जात होती. अशा काळामध्ये महाराष्ट्र एक असं राज्य ठरलं ज्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मांच्या मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार त्या त्या जाती-धर्माच्या इतमामात झाले. या महाभयंकर महामारीच्या काळात राजकारण बाजूला ठेवत माणुसकी म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं अपेक्षित होतं. पण भारतीय जनता पार्टीचे नेते हे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करण्याऐवजी पीएम केअर फंड मध्ये पैसे टाका असे अत्यंत निर्लज्जपणे सांगत होते. या पीएम केअर फंड बद्दल माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आता माहिती मागितली असता हा फंड खाजगी होता असे उघड झाले, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.