नियोजन हाच शिष्यवृत्ती परीक्षेचा मूलमंत्र

>> अविनाश कुलकर्णी, व्ययवसाय मार्गदर्शक आणि समुपदेशक

प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक स्तरावरील या शैक्षणिक वर्षातील शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा येत्या 18 फेब्रुवारी रोजी नियोजित आहेत. शेवटचे आठ दिवस परीक्षेसाठी बाकी आहेत. स्पर्धेद्वारे शिष्यवृत्ती मिळवणे हे फक्त खूप हुशार विद्यार्थ्यांचेच काम हा गैरसमज अनेक पालक आणि काही शिक्षकांमध्येही दिसतो. अभ्यासाच्या काही सूत्रांचे पालन केल्यास कोणत्याही स्पर्धेत यश मिळवणे अधिक सोपे होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत सहभाग घेऊन शिष्यवृत्ती मिळवणे हे त्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या शाळेसाठीदेखील प्रतिष्ठsचे समजले जाते. या गोष्टी अमलात आणून यशस्वी होता येईल.

1. वेळेचे नियोजन – शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता हे चार विषय दोन वेगवेगळय़ा पेपरमध्ये विभागले आहेत. उपलब्ध 90 मिनिटांपैकी शेवटची 10 मिनिटे अवघड असलेल्या प्रश्नांसाठी राखीव ठेवून उर्वरित प्रश्न 75 ते 80 मिनिटांत सोडवण्याचा प्रयत्न केला तर सर्व सोडवता येतात.

3. सातत्य – नित्याची कामे, शाळेतून दिला जाणारा अभ्यास, पुरेशी झोप, जेवण इत्यादी करण्यासाठी लागणारा वेळ सोडून दररोज जास्तीत जास्त किती वेळ या परीक्षेच्या तयारीसाठी देता येईल हे निश्चित करावे. आता दिवसातून चार ते पाच तास पुरेसे असतात. एकाच वेळी शक्य नसेल तर विभाजन करता येईल. कितीही अडचणी आल्या तरी निश्चित वेळेत या परीक्षेचाच अभ्यास करणे नक्कीच यशाच्या जवळ घेऊन जाईल.

2. तज्ञ मार्गदर्शन – चुकते आहे तेथे दुरुस्ती व्हायलाच हवी, पण नक्की काय आणि का चुकते याचे मार्गदर्शन विविध माध्यमांतून घेता येऊ शकते. शाळेतील शिक्षक, पुस्तके, यूटय़ूब, गुगल, हुशार मित्र, जाणकार मंडळी, नातेवाईक यांपैकी जो मार्ग उपलब्ध असेल तो नक्कीच वापरून त्रुटी दूर कराव्यात.

4. वर्गीकरण – मागील पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरे https://2024.mscepuppss.in/Startpage.aspx या अधिकृत वेबसाइटवर मोफत आहेत. कोणत्याही तीन प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून नक्की काय विचारले जाते हे मुद्देसूद लिहून त्यातील कोणते प्रश्न सोडवता येतात आणि कोणते सोडवता येत नाहीत याचे वर्गीकरण करावे. उत्तरे लिहिता न येणारे भाग एक-एक करून समजून घ्यावेत.
5. सराव ः विविध प्रकाशनांच्या भरपूर प्रश्नपत्रिका शाळेत असतात तसेच इंटरनेटवरदेखील मोफत उपलब्ध आहेत. तुमच्या आजवरच्या अभ्यासास प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या सरावाची जोड द्या. नक्कीच यश प्राप्त करून देईल.