यंगिस्तान – किल्ले सामानगड

>>  डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक

‘सात कमान’ विहीर ज्या गडाचे आभूषण आहे तो गड म्हणजे ‘किल्ले सामानगड’ होय.

महाराष्ट्रात दुर्ग बांधण्याच्या प्रक्रियेत कोल्हापूरच्या शिलाहार भोज राजा दुसरा यांचा खूप मोठा वाटा आहे. सातारा व कोल्हापूर जिह्यांतील बहुतांशी गडकोटांची बांधणी या भोज राजानेच केली. या भोज काळातील दुर्ग बांधणीचे वैशिष्टय़ म्हणजे जांभ्या दगडात खोदून काढलेल्या वैशिष्टय़पूर्ण विहिरी. यापैकी दातेगडावरील तलवार विहीर आणि कमळगडावरील कावेची विहीर ही सर्व दुर्गप्रेमींना परिचित आहे. याशिवाय कोल्हापूर जिह्यात एका किल्ल्यावर ‘सात कमान’ नावाची एक सुंदर विहीर भोज राजाच्या कारकीर्दीतच खोदून काढलेली आहे. शेकडो वर्षे उलटूनसुद्धा आजही ही ‘सात कमान’ विहीर ज्या गडाचे आभूषण आहे तो गड म्हणजे ‘किल्ले सामानगड’ होय.

सामानगडास भेट देण्यासाठी आपणास कोल्हापूर-गडहिंग्लज-भडगाव-चिंचेवाडी असा प्रवास करावा लागतो. गडावर जाण्यासाठी थेट गाडीरस्ता झाल्याने आबालवृद्ध या गडाला भेट देऊ शकतात. सुस्थितीत असलेला सामानगडाचा दर्शनी बुरूज आपले स्वागत करतो. पुढे एका कमानीतून आपण गडप्रवेश करतो. गडप्रवेश करताच एक वाट सरळ पूर्वेकडील गडाच्या महादरवाजाकडे जाते, तर डावीकडे जाणारी वाट गडाच्या मध्यवर्ती असलेल्या महत्त्वाच्या अवशेषांकडे जाते. आपण आधी महादरवाजाकडे आपला मोर्चा वळवायचा. हा दरवाजा इंग्रजांनी उद्ध्वस्त केल्यानंतर पूर्णतः विस्मृतीत गेला होता. पुढे शेकडो वर्षे दुर्लक्षित राहिल्याने तो मातीखाली गाडला गेला, पण ‘दुर्गवीर’ दुर्गसंवर्धन संस्थेने गाडल्या गेलेल्या भग्न दरवाजाचे अवशेष पुन्हा एकदा मोकळे करून प्रकाशझोतात आणले. नंतर सोंडय़ा बुरूज नावाचा भव्य चिलखती बुरूज गाठायचा. वाटेत तटामध्ये एक शौचकूप दिसून येते. सोंडय़ा बुरुजाच्या समोर एक छोटीशी टेकडी आहे. या टेकडीवर मुघलांनी दमदमे रचून गडावर तोफांचा मारा केला होता म्हणून या टेकडीस ‘मुघल टेकडी’ म्हणतात. सोंडय़ा बुरूज पाहून परत जाताना तटाच्या खाली आपणास बॉटलच्या आकाराचे दहा-बारा फूट उंचींचे काही खांब दिसून येतात.

सामानगडाचा आकार छोटेखानी आहे. गडाच्या मध्यवर्ती भवानी देवीचे मंदिर आहे. सात कमानी विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी कातळकोरीव पायऱया आहेत. पुढे या विहिरीत जांभ्या दगडात कोरलेल्या सुंदर कमानी दिसतात. बाजूला जांभ्या दगडात खोदून काढलेली अजून एक विहीर आहे. पुढे निशाणी बुरूज पाहून झाला की, आपली भटपंती पूर्ण होते.

वीरांना मानवंदना
भोज राजाने बांधलेला हा गड 1667 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. आदिलशाही सरदार बहलोलखान हा तावडीत सापडूनही सरसेनापती प्रतापराव गुजरांनी त्याला सोडून दिले हे महाराजांना आवडले नाही आणि तोच बहलोलखान पुढे स्वराज्यातील प्रजेला त्रास देऊ लागला. त्यामुळे महाराजांनी ‘गनिमास गर्दीस मिळविल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका’ असा कडक शब्दांत प्रतापरावांना निरोप धाडला. हे पत्र मिळाले तेव्हा प्रतापराव सामानगडाच्या जवळच होते. हे पत्र वाचून प्रतापराव बेभान झाले. त्यामुळे सामानगडावरील आपल्या सैन्याची मदत न घेता केवळ सोबतच्या सहा मावळय़ांसोबत त्यांनी बहलोलखानाच्या सैन्यावर चाल केली व यात हे सातही वीर धारातीर्थी पडले. नेसरी गावात या सात वीरांचे स्मारक आहे. सामानगडाची वारी करायची ती या सात वीरांना मानवंदना देण्यासाठी.