मुद्रा – स्वरयोगिनीचा वियोग

ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता झाली.

सावनी शेंडे

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे हे संगीताच्या क्षेत्रातलं एक विद्यापीठ होतं. किराणा घराण्याची जाज्वल्य आणि तेजस्वी परंपरा त्यांनी सदैव आपल्या गाण्यातून दाखवली.

ख्याल, ठुमरी, दादरा, गझल यांसारख्या विविध गायन प्रकारांत त्यांचे नैपुण्य होते. बंदिशींची एक खूप मोठी परंपराही त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला दिली. लहानपणापासूनच त्यांच्या गायनाचे संस्कार माझ्यावर झाले आणि त्यांच्या विचारांचे अमृतकण मला मिळाले. त्यांचा  वियोग खूप मोठी पोकळी निर्माण करणारा आहे.

हिंदुस्थानी गानपरंपरेतील ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाने खऱया अर्थाने एका स्वरयोगिनीला आपण मुकलो आहोत.   स्वरयोगिनी, संगीत विचारवंत , लेखिका अशी बहुआयामी ओळख असलेल्या डॉ. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या बुजुर्ग गायिका होत्या. किराणा घराण्याची जाज्वल्य आणि तेजस्वी परंपरा त्यांनी सदैव आपल्या गाण्यातून दाखवलीच; पण त्याही पलीकडे जाऊन डॉ. प्रभा अत्रे हे एक वेगळं घराणंच होतं असं म्हणावं लागेल. या घराण्याला किराणा घराण्याचं कोंदण निश्चित होतं; पण त्यातील प्रतिभा त्यांची स्वतची होती. घराण्याच्या बंधनात स्वतला न ठेवता त्यापुढची त्यांची वाटचाल विशेष कौतुकास्पद होती. घराण्याच्या चौकटीत राहूनच स्वत:ची वेगळी वाट शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संगीतात प्रत्यक्ष मैफलीत होणारे गायन ही एक अतिशय महत्त्वाची सांस्कृतिक घटना असते याचे भान प्रभाताईंना अगदी लहानपणापासून होते. उच्चविद्याविभूषित असल्याने या कलेकडे अधिक डोळसपणे पाहण्याची वृत्तीही त्यांनी अंगी बाणवली.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधलं त्यांचं योगदान अमूल्य आणि अमीट आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात प्रभा अत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ख्याल, ठुमरी, दादरा, गझल यांसारख्या विविध गायन प्रकारांत त्यांचे नैपुण्य होते. जुन्याची कास धरूनही त्यांनी कायम नवतेचा शोध घेतला ही त्यांच्या कारकीर्दीतली सर्वात वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. गायकीच्या क्षेत्रात विशेषत शास्त्रीय संगीतामध्ये असं म्हटलं जातं की, गायकाचा स्वभाव त्याच्या गाण्यातून प्रतिबिंबित होत असतो, अशी ही कला आहे. त्या परिप्रेक्ष्यातून सांगायचं झाल्यास डॉ. प्रभा अत्रे यांचा स्वभाव मूलत देव्हाऱयात शांतपणाने तेवणाऱया निरांजनासारखा शांत आणि मृदू होता. गानसंगीताच्या क्षेत्रात इतका प्रचंड नावलौकिक मिळवूनही सदैव जमिनीवर पाय असणाऱया प्रभाताईंना कधीही कुणी चिडलेलं, रागावलेलं पाहिलं नाही. त्यांचं गाणंही तसंच अत्यंत सोज्वळ होतं.

शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात शिस्तीला खूप महत्त्व आहे. प्रभाताईंच्या गायकीतून या शिस्तीचं ओतप्रोत दर्शन अत्यंत प्रभावीपणाने व्हायचं. संगीताच्या नियमांच्या चौकटीत राहूनच मुक्त होता आलं पाहिजे. तीच सर्जनशीलतेची वाट असते. सर्जनशीलता म्हणजे मनमानी नव्हे, असं त्या सांगत असत.

प्रभाताईंच्या गायन वैशिष्टय़ाचे अनेक पैलू आहेत. ठहराव हा त्यातील सर्वश्रेष्ठ पैलू म्हणता येईल. आजकालच्या गायनामध्ये तो हरवत चालला आहे. त्याअनुषंगाने प्रभाताईंच्या गाण्यातील अनेक कंगोऱयांचा आदर्श आजच्या पिढीने ठेवायला हवा. ‘सरगम’ हे त्यांच्या गायनाचं एक महत्त्वाचं वैशिष्टय़. स्वरसंगीतातील या अतिशय लोभस अलंकाराचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून डॉ. अत्रे यांनी सादर केलेल्या प्रबंधाला पीएच.डी. पदवीही मिळाली. ‘सरगम’मध्ये तर त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. ‘सरगम’मध्ये लालित्यपूर्णता असते, बुद्धिमत्तेचा कस असतो आणि शिवाय ते तितकंच मनोरंजक आणि चैतन्यपूर्ण असतं. अशा या ‘सरगम’चा अद्वितीय नमुना त्यांनी आपल्यासमोर ठेवला आणि असंख्य बंदिशी त्यांनी स्वत रचल्या. वेगवेगळ्या अर्थाच्या, वेगवेगळ्या रागांमधील, वेगवेगळ्या चालींमधील  या बंदिशींना अत्यंत सुंदर साहित्याची जोड होती.

शास्त्रीय संगीतात रागप्रदर्शन हा मुख्य हेतू असला तरी त्याव्यतिरिक्त अनेक वेगळ्या वाटा रसिकांना प्रभाताईंच्या गायनातून अनुभवायला मिळाल्या आणि वेगवेगळं साहित्यही मिळालं. त्यामुळे बंदिशींची एक खूप मोठी परंपराही त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला दिली. मारुबिहार, कलावती या  रागांवर त्यांची अक्षरश हुकमत होती. त्यांच्या या बंदिशी असंख्य वेळा ऐकल्या गेल्या आणि जातील. राग संगीतातील भावात्मकतेला प्राधान्य देत, शब्दांना स्वरांचा मुलामा चढवत त्यांनी आपली गायन शैली विकसित केली. त्यामुळेच त्यांचं गायन त्यांच्या समकालीन कलावंतांपेक्षा वेगळं आणि उठावदार झालं.

वयाच्या शंभरीसमीप पोहोचूनही शेवटपर्यंत त्या अत्यंत उत्साही  असायच्या, कार्यरत असायच्या. मी लोकांना नवीन काय देऊ याचा ध्यास त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत होता. अभिजात संगीत अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी सुरू केलेला संग्रहालयाचा प्रकल्प असो की ‘स्वरमयी गुरुकुल’ या नावाने नव्या कलावंतांना रसिकांसमोर सादर करण्याची योजना असो, प्रभाताई नेहमीच संगीतासाठी कार्यरत राहिल्या. भाषेवरचं प्रभुत्व हा प्रभाताईंच्या कारकीर्दीतला शिरोमणी म्हणायला हवा. अनेकदा कलाकार महान असतात; पण त्यांना तितक्या प्रभावीपणाने व्यक्त होता येत नाही, पण भाषाप्रभू असल्यामुळे प्रभाताईंना कधीच ही मर्यादा आली नाही. मराठी, हिंदी भाषेत तर त्या लेक्चर द्यायच्याच; पण अस्खलित इंग्लिश भाषेतूनही त्या व्यक्त व्हायच्या. त्यामुळे त्या एक अलौकिक व्यक्तिमत्त्व होत्या. अभ्यासातून मिळालेल्या ज्ञानसंपदेचा आपल्या गायकीमध्ये त्यांनी अत्यंत सुरेखपणाने वापर केला. त्यामुळे किराणा घराण्याच्या कोंदणात असूनही त्यांची गायकी वेगळी वाटायची. निर्मात्याने बुद्धी आणि मन यांच्या अगदी मधोमध दिलेल्या गळ्याचा त्यांनी आयुष्यभर सुरेखपणाने उपयोग केला, असं मी म्हणेन.

मी स्वत प्रभाताईंकडे शिकले नसले तरी त्यांच्या सगळ्या गायकीचा प्रभाव माझ्या गाण्यामध्ये दिसून येतो. याचं कारण माझं लहानपण त्यांच्या सान्निध्यात गेलं. पुण्यामध्ये आमच्या घरी त्या राहायच्या तेव्हा आठ-आठ दिवस गाण्याविषयीच्या चर्चा होत असत. त्यांच्या कित्येक मैफली समोर मांडी घालून बसून मी ऐकल्या आहेत. त्या भारावलेल्या वातावरणात रात्री घरी यायचं आणि आल्यानंतर पुन्हा त्यावर तासतासभर चर्चा व्हायच्या. प्रभाताई हिराबाईंकडे शिकलेल्या आणि माझी आजी त्यांची बहीण सरस्वतीबाईंकडे शिकली होती. त्यामुळे दोन गुरुभगिनींच्या सांगीतिक चर्चेतील अमृतकणांचे अगदी बालवयापासून माझ्यावर संस्कार होत गेले. याशिवाय ठुमरी हा त्यांचा हातखंडा विषय होता. याविषयी माझ्या वडिलांबरोबर त्यांच्या झालेल्या चर्चेचे काही कवडसे आजही माझ्या स्मरणात आहेत. त्याचा उपयोग आता होत आहे. या स्वरयोगिनीचा सहवास लाभणं, त्यांच्या संगीत संस्कारांची शिदोरी लाभणं याबाबत मी स्वतला भाग्यवान समजते. प्रभाताईंशी आमचा कौटुंबिक स्नेह खूप वर्षांपासूनचा आणि अत्यंत जवळचा होता. त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांनाही त्यांचे आशीर्वाद लाभले. प्रभाताईंचे विचार वैभव खूप वेगळं होतं. मारुबिहारमध्ये शुद्ध मध्यम मी का घेणार नाही, यासाठी त्यांचं स्पष्टीकरण असायचं. उगाचंच मला वाटलं आणि मी घेतलं असा प्रकार त्यांनी कधीच केला नाही. त्यांच्या भूमिकांना बुद्धिमत्तेची जोड असायची. लहानपणापासून मी पाहत आले की, त्या आपली मतं मांडताना मृदूपणाने मांडायच्या; पण त्यांची मतं ठाम असायची.

मला आठवतंय, मागे एकदा दिल्लीमध्ये शिवजी आणि प्रभाताईंचं एक चर्चासत्र रंगलं होतं. त्यामध्ये त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता, तो म्हणजे कर्नाटक संगीतामध्ये कुठलाही राग सादरीकरणाला वेळेचं बंधन नाहीये; मग आपण ते का पाळावं? रेकॉर्डिंग करताना आपण सकाळचा राग असला तरी स्टुडिओच्या उपलब्धतेनुसार दिवसभरात केव्हाही जाऊन रेकॉर्डिंग करतो. त्यापलीकडे जाऊन एखाद्या बंद ऑडिटोरियममध्ये जिथे  बाहेरच्या जगाशी, सृष्टीशी संबंध येत नाही तेव्हा तिथे कोणता राग गाता आहात त्यापेक्षा त्या रागाशी तुम्ही समरस-एकरूप किती होताय हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणताही राग कधीही गायला, पण प्रभावीपणाने गायला तर समयबंधनाची मर्यादा आड येत नाही. म्हणून याबाबत आपण पुढे गेलं पाहिजे, असं शिवजींचं मत होतं आणि प्रभाताईंनी ते उचलून धरलं होतं. मला त्या नेहमी म्हणत असत की, कितीही जग बदललं तरी शास्त्रीय संगीतात थोडेफार फेरफार होतील;  पण आपण शांतता सोडायची नाही, ख्याल सोडायचा नाही. आजकाल नेमकं तेच होताना दिसतं. वास्तविक, नैसर्गिकरीत्या आपल्याबरोबर चालत आलेलं संगीत आहे, जे निसर्गाच्या जवळ जाणारं आहे, ते शास्त्रीय संगीत हळुवारपणाने सुरू करूनच मग त्याचा क्लायमॅक्स आणि लय वाढली तर त्यात मजा आहे आणि तेच नैसर्गिक वाटतं, हे प्रभाताईंचे विचार आजच्या काळात खूप जपले गेले पाहिजेत. समग्रदृष्टय़ा विचार करता शास्त्रीय संगीताच्या-गायनाच्या क्षेत्रात येणाऱयांसाठी डॉ. प्रभा अत्रे या एक विद्यापीठ होतं. त्यांच्यातील माणूसपणही तितकंच मोलाचं होतं. सर्वांशी मिळून मिसळून वागणं हा त्यांचा स्थायीभाव होता. ऑर्गनायझर्सपासून सर्वांशी त्या अत्यंत मृदूपणाने बोलायच्या. इतकंच नव्हे, तर संगीताविषयी चर्चा करण्यासाठी कुणी नवतरुण जरी आला तरी त्याच्याशी त्या आदराने बोलत असत. त्यांची मतं जाणून घेऊन मग त्या स्वतची मतं मांडत असत. यातून त्यांची शालीनता आणि खानदानीपणा नेहमीच दिसून यायचा. आयुष्य प्रवासात त्यांनी कठीण काळही पाहिला; पण आपली गाण्यावरची श्रद्धा किंवा कामाबाबतचा समर्पण भाव कुठेही कमी होऊ दिलं नाही. शास्त्रीय संगीताबरोबरच इतर संगीत प्रवाहांबद्दल प्रभाताईंना विलक्षण आदर होता. लतादीदींच्या गाण्यावर तर त्यांचं अफाट प्रेम होतंच; पण एखादं सिनेसंगीत ऐकतानाही त्या भरभरून स्तुती करायच्या. सर्व प्रवाहांबद्दलची ही स्वीकारार्हता मला खूप महत्त्वाची वाटते.

प्रभाताई एकाच वेळी उत्तर हिंदुस्थानी रागही गायच्या आणि त्याच वेळी दक्षिण हिंदुस्थानी शैलीतील रागही त्यांनी आपल्या सादरीकरणातून लोकप्रिय केले. याखेरीज त्यांचे स्वरचित रागही आहेत. माझं भाग्य असं की, त्या जाण्याच्या दोन महिने आधी ‘गुरुकुल‘मध्ये त्यांनी निर्माण केलेले राग गाण्याची संधी मला त्यांनी दिली. केवळ बंदिशी नाहीत तर अपूर्वकल्याण, मधुरकंस हे दोन राग त्यांच्या समोर मी सादर केले तेव्हा त्यांचे खूप आशीर्वाद लाभले. पण माझ्यासाठी त्यांचेच राग त्यांच्यासमोर गायला मिळाले हीच खूप मोठी बाब होती. त्यामुळे प्रभाताईंचा वियोग हा शास्त्रीय संगीतात खूप मोठी पोकळी निर्माण करणारा आहेच; पण व्यक्तिश माझ्यासाठी तो खूप मोठा चटका देणारा आहे. माझं हक्काचं गान संस्कारांचं व्यासपीठ आणि आशीर्वादाचे हात आता उरले नाहीत, ही बाब वेदनादायी आहे.

(शब्दांकन : हेमचंद्र फडके) 

(लेखिका प्रख्यात शास्त्रीय गायिका आहेत)