विक्रोळीतील शैक्षणिक संस्थेचा भूखंड खासगी संस्थेला देऊ नका! शिवसेनेची सरकारकडे मागणी

विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगरमधील महिला तंत्र निकेतनसाठी आरक्षित असलेला भूखंड एका खासगी संस्थेला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. हा सरकारी भूखंड कोणत्याही परिस्थितीत खासगी संस्थेला देण्यात येऊ नये आणि निविदा प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी राज्य सरकार आणि म्हाडाकडे केली आहे. दरम्यान, निविदा रद्द केली नाही तर विक्रोळीकर रस्त्यावर उतरून चक्का जाम करतील, जनआंदोलन उभारतील, असा इशाराही सुनील राऊत यांनी दिला आहे.

विक्रोळीतील कन्नमवार नगर आणि टागोर नगरमध्ये 60 वर्षांपूर्वी बांधलेल्या सर्वात मोठय़ा म्हाडा वसाहती आहेत. मात्र, आता त्या मोडकळीला आल्यामुळे इथे मोठय़ा प्रमाणात पुनर्विकासाचे काम सुरू आहे. वाढते नागरीकरण लक्षात घेऊन अनेक वर्षांपूर्वीच विक्रोळीतच नागरी सुविधांसाठी राज्य सरकारने जिल्हाधिकारी, म्हाडा प्राधिकरणाकडे काही भूखंड सोपवले आहेत. हे भूखंड स्थानिकांसाठी उद्याने, महापालिका शाळा, महिला तंत्र निकेतन, कामगार कल्याण पेंद्र, जलतरण तलाव, रुग्णालये, पालिका दवाखाने यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. मात्र भूखंडांवरील आरक्षण काढून नागरी सुविधांसाठी असलेले हे भूखंड खासगी संस्थांकडे सोपवण्याचा पद्धतशीर डाव आखण्यात आला आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन

स्थानिक रहिवाशांसाठी विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये महिला तंत्र निकेतनसाठी राखीव असलेला भूखंड नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून एका खासगी संस्थेला देण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी 2024 एमएचडी-1034195 1 ही ईनिविदाही प्रसिद्ध केली आहे, मात्र असे केल्याने याचा फटका स्थानिक तरुणी आणि रहिवाशांना बसणार आहे. व्यावसायिक शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या त्यांच्या स्वप्नांना मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे तातडीने ही निविदा रद्द करा, अशी मागणी आमदार सुनील राऊत यांनी केली आहे.