राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांची उद्या संविधान वाचवा सभा; शिवसेना भवनमध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख नेते, मुंबईतील सर्व उमेदवार उपस्थित राहणार

भाजपकडून देशातील संसदीय लोकशाही आणि संविधानावर घाला घालण्याचे काम सुरू असून लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्व लोकशाही आंबेडकरवादी संघटना, सामाजिक संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची सभा मंगळवार, 30 एप्रिलला दुपारी 3 वाजता दादरमधील शिवसेना भवनमध्ये आयोजित करण्यात आली आहे. सभेला महाविकास आघाडी पक्षांतील प्रमुख नेते आणि मुंबईतील सर्व उमेदवार उपस्थित राहणार आहेत. सभेत ‘कृती कार्यक्रमावर व्यावहारिक सूचना आणि अंमलबजावणी’ कशी करावी, याविषयी मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

भाजपकडून देशात एकाधिकारशाही आणि हुकूमशाही सुरू आहे. विकासाच्या नावे गोष्टी करायच्या, परंतु कृती न करता ईडी, सीबीआय, निवडणुक आयुक्त, न्यायपालिका, कायदा सुव्यवस्था यांच्यावर दबाव आणून विरोधकांना तुरुंगात टाकले जात आहे. संविधानिक अधिकारांची मोडतोड करण्याचीच हमी म्हणजे ‘मोदी गॅरंटी’ असे सर्वांना वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मोदींकडून देशाला असलेला धोका समजून घेऊन या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेला शिवसेना नेते सुभाष देसाई, काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई, अर्जुन डांगळे, भालचंद्र मुणगेकर, तुषार गांधी, विद्या चव्हाण, मधु मोहिते, श्याम गायकवाड,  उदय नारकर, प्रकाश सोनावणे, सुभाष लांडे, मौलाना नदीम, राजेंद्र कोरडे, राखी जाधव, संध्या गोखले, प्रीती मेनन, इरफान इंजिनीअर, सुधाकर सुराडकर , सुनील खोब्रागडे, प्रभाकर नारकर, मौलाना बुमाई हसनी, संध्या म्हात्रे, फैजुलला खान, शंकर बगाडे, शाकीर शेख, श्वेता दामले आदी उपस्थित राहणार आहेत.