Delhi Liquor Case : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाही; ED कोठडी कायम

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांची ईडी कोठडी आज संपत असल्याने त्यांना राउज एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांच्या ईडी कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ केली.

ईडीने मागितली होती 7 दिवसांची कोठडी

केजरीवाल यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पण ते प्रश्नांना सरळ उत्तर देत नाहीत. जो डिजिटल डेटा मिळाला आहे, त्याचीही पडताळणी करायची आहे. अजून केजरीवाल यांचा आणखी काही लोकांशी आमना-सामना घडवायचा आहे. यामुळे केजरीवाल यांना आणखी 7 दिवसांची ईडी कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी न्यायालयात केली. ईडीकडून एएसजी एसव्ही राजू आणि विशेष वकील जोहेब हुसैन हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे उपस्थित होते. तर मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या वतीने वरिष्ठ वकील रमेश गुप्ता हे न्यायालयात प्रत्यक्ष हजर होते. दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कडेकोट सुरक्षा ठेवली होती.

मुख्यमंत्री केजरीवाल कोर्टात काय म्हणाले?

तपासात सहकार्य करणारे ईडीचे अधिकारी आणि कमर्चाऱ्यांचे आभार मानतो. कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात 22 ऑगस्ट 2022 ला ED ने ECIR दाखल केला होता. आणि आता मला अटक केली. आतापर्यंत कुठल्याही न्यायालयाने मला दोषी ठरवलेलं नाही. ईडीने आतापर्यंत 31 हजार पानांचे दस्तऐवज जमा केले आहेत. फक्त 4 जबाबांत माझा उल्लेख आला आहे. माझ्या घरी आमदारांसह अनेक लोक येतात. यामुळे काय चाललं आहे, याची मला कल्पना नाही. हे जबाब मला अटक करण्यासाठी पुरेसे आहेत का? असा प्रश्न मुख्यमंत्री केजरीवाल यांनी न्यायालयात उपस्थित केला. तुम्ही हे सर्व लेखी स्वरुपात का देत नाही? असे न्यायालयाने केजरीवाल यांना विचारले. मला न्यायालयात बोलायचं आहे, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयाला सांगितलं.