म्युच्युअल फंड – गुंतवणूक ध्येय ठरवा

>>कौस्तुभ खोरवाल ( प्राध्यापक आणि गुंतवणूक तज्ञ )

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा डेटा पाहिल्यास दिसून येते की, 90 टक्के गुंतवणूकदार पाच वर्षांहून अधिक काळ म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करत नाहीत. याचे मुख्य कारण गुंतवणूक करण्यामागील ध्येय निश्चित नसते. ही चूक आपल्याकडून होऊ नये म्हणूनच म्युच्युअल फंड गुंतवणूकबाबतचे पैलू जाणून घेऊ.

ध्येय निश्चित करण्याची प्रक्रिया

1 म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा उद्देश ठरवावा.
उदा. ः हमी परतावा देणाऱया गुंतवणूक पर्यायापेक्षा अधिक गुंतवणूक परतावा मिळवणे.

2 मनातील इच्छेनुसार पुढील दहा ते पंधरा वर्षांतील अपेक्षित आर्थिक स्तर ठरवावा.
उदा. ः किमान दहा लाख रुपयांचा फंड जमा करणे.

3 भविष्याची आर्थिक तरतूद स्वरूपात ठरवलेल्या रकमेनुसार दरमहा गुंतवणूक करण्याची रक्कम निश्चित करावी.
उदा. ः सध्या उत्तम कार्य करणारे म्युच्युअल फंड किमान (सरासरी) बारा टक्के परतावा देत आहेत. आपण पुढील दहा वर्षांसाठी सरासरी दहा टक्के गुंतवणूक परतावा गृहीत धरून महिन्याला पाच हजार रुपयांचा एसआयपी सुरू केल्यास दहा लाखाची रक्कम (फंड) होईल. त्यामध्ये आपली एकूण गुंतवणूक सहा लाख रुपये असेल आणि वरील चार लाख हा गुंतवणूक परतावा असेल.

4 ध्येय पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक नियोजन तयार करावे.
(वरील उदाहरणानुसार पाच हजारांचा एसआयपी एकाच म्युच्युअल फंड योजनेत न करता, तीन ते पाच विविध म्युच्युअल फंड योजनेत दरमहा एक हजाराचा एसआयपी सुरू करावा.)

5 गुंतवणूक ध्येय पूर्ण होण्याआधी कधीही म्युच्युअल फंड योजनेतून पैसे काढून घेऊ नये. कारण बाजारात चढ-उतार असतो. आपण दरमहा सातत्याने दीर्घकाळ गुंतवणूक करत असल्यामुळे आपली गुंतवणूक मूल्य वाढ होत असते. ही मूल्य वाढ पैसे काढून कमी केल्यास गुंतवणूक ध्येयपूर्तीस अधिक कालावधी लागेल.

एसआयपी हा शब्द जरी उच्चारला तरी म्युच्युअल फंड गुंतवणूकबाबत बोलत असल्याची जाणीव होते. येथे ‘जाणीव’ या शब्दाचा उल्लेख मुद्दाम केला आहे. कारण प्रत्येक गोष्ट जाणिवेतून निर्माण होते.

आपल्या स्वभावात संयम आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याचा गुण विकसित केल्यास म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे.

छोटी बचत करणाऱया व्यक्तीला शेअर बाजारातील गतीचा फायदा घ्यायचा असल्यास म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सर्वात उत्तम पर्याय आहे. कारण कुठलाही अनुभव नसताना थेट शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. हा धोका न स्वीकारता म्युच्युअल फंडमधील इक्विटी (रोखे / शेअर्स) योजनेतील गुंतवणूकद्वारे शेअर बाजारातील संभाव्य परतावा मिळू शकतो.

म्युच्युअल फंड कंपनीने नियुक्त केलेले गुंतवणूक अभ्यासक (फंडामेंटल टीम आणि टेक्निकल टीम) योग्य पद्धतीने लोकांच्या पैशांची गुंतवणूक इक्विटी (रोखे) मध्ये करते. त्यामुळे म्युच्युअल फंड युनिट्सधारकांना दीर्घकाळासाठी केलेल्या गुंतवणुकीतून मोठे भांडवल निर्माण होते.

डेट म्युच्युअल फंड गुंतवणूक

म्युच्युअल फंडमध्ये अल्प (1 ते 3 वर्षे) किंवा मध्यम (3 ते 5 वर्षे) कालावधीसाठी गुंतवणूक करायची असल्यास डेट (कर्जरोखे) योजनेमध्ये करावी. डेट फंड हे निश्चित परतावा देणाऱया उच्च दर्जाच्या कर्जरोखेमध्ये पैशांची गुंतवणूक करतात. त्यामुळे बँक मुदत ठेवीहून अधिक परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते.

म्युच्युअल फंड योजनेत दरमहा निश्चित रकमेची गुंतवणूक (एसआयपीद्वारे) दीर्घकाळासाठी (किमान दहा वर्षे) केल्यास भांडवल तयार होते. पण त्याआधी गुंतवणूकदाराचे ध्येय निश्चित असले पाहिजे. कारण गुंतवणूक करण्यामागे हेतू स्पष्ट नसल्यास दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची जिद्द मनात राहत नाही. सध्या शेअर बाजारातील लार्ज पॅप शेअर्सचे भाव हजार किंवा त्याहून अधिक आहेत. त्यामुळे छोटय़ा गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड इक्विटी फंड योजना उत्तम पर्याय आहे.