हिंदुस्थान-पाकिस्तान मालिकेच्या आयोजनासाठी ऑस्ट्रेलिया इच्छुक

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटयुद्ध जगाच्या पाठीवर कुठेही खेळविले तरी ब्लॉकबस्टर यश मिळवू शकते. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) पुन्हा एकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केलीय. जर बीसीसीआय आणि  पीसीबी द्विपक्षीय मालिका खेळण्यास सहमत असतील तर आम्ही यजमानपदासाठी तयार आहेत, असे खुद्द ‘सीए’ने पुन्हा एकदा म्हटले आहे. 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतरही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अशी इच्छा व्यक्त केली होती.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नुकतेच आपले वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार हिंदुस्थान आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात असतील. टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी, तर पाकिस्तान वन डे आणि टी-20 मालिकेसाठी तिथे असेल. हे पाहता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा हिंदुस्थान-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

2007 मध्ये झाली शेवटची कसोटी मालिका

हिंदुस्थान-पाकिस्तानने शेवटची द्विपक्षीय मालिका 2012 मध्ये हिंदुस्थानात खेळली होती. ही मर्यादित षटकांची मालिका होती. दोन्ही देशांमधील शेवटची कसोटी मालिका 2007 मध्ये खेळली गेली होती. उभय संघांमध्ये 12 वर्षांपासून द्विपक्षीय मालिका झालेली नाहीय.