मुंबई श्री नाही, महाराष्ट्र श्रीसुद्धा नाही, थेट ‘भारत श्री’

>> मंगेश वरवडेकर

गतवर्षी मुंबई शरीरसौष्ठव संघटनेत उभी फूट पडल्यामुळे दोन-दोन संघटना निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा दोन-दोन दिमाखदार मुंबई श्री स्पर्धा खेळविल्या जाणार हे स्पष्ट होते. त्यानुसार बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेने आपली ताकद दाखवताना मुंबई श्री स्पर्धेसह महाराष्ट्र श्रीचेही भव्य आयोजन केले. मात्र ज्या शरीरसौष्ठव संघटनेचे राष्ट्रीय आणि राज्य संघटनेचे कार्यालय मुंबईत आहे, पण विभाजनामुळे कमकुवत झालेल्या मुंबई जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेला आणि महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेला ना मुंबई श्री घेता आली ना महाराष्ट्र श्री. त्यामुळे या संघटनांनी प्रतिष्ठेच्या या स्पर्धा न खेळवता आपल्या खेळाडूंना थेट ‘भारत श्री’ स्पर्धेत पाठवून आपला दुबळेपणा चव्हाटय़ावर आणला.

हिंदुस्थानी शरीरसौष्ठव संघटनेची खरी ताकद मुंबईतील शरीरसौष्ठव संघटनेत आहे. हिंदुस्थानातील सर्वाधिक शरीरसौष्ठवपटू मुंबईतच आहेत आणि सर्वाधिक शरीरसौष्ठव स्पर्धाही या मुंबापुरीतच होतात. त्यामुळे मुंबईलाच शरीरसौष्ठवाची नगरी समजले जाते. शरीरसौष्ठवपटूंमध्ये ‘मुंबई श्री’ची व्रेझ ऑस्कर पुरस्कारासमान आहे. ही जिंकण्यासाठी सर्वच खेळाडू तासन्तास व्यायायशाळेत घाम गाळतात. काही तर आपले सर्वस्व पणालाही लावतात. काहींनी तर ही श्री जिंकण्यासाठी पैशांची सेटिंगही लावल्याचे ऐकिवात आहे. अशी मुंबईच्या शरीरसौष्ठवाच्या मानाची, सन्मानाची आणि गौरवाची स्पर्धा न घेतल्याबद्दल खेळाडूंच्या मनात प्रचंड खदखद निर्माण झाली आहे.

छोटी का होईना, ‘मुंबई श्री’ व्हायला हवी होती
ज्या स्पर्धेची मुंबईचे शरीरसौष्ठवपटू चातकाप्रमाणे वाट पाहत असतात महिनोंमहिने तयारी करत असतात ती ‘मुंबई श्री’ छोटी का होईना, व्हायला हवी होती. संघटनेत पडलेली फूट नक्कीच त्रासदायक आहे, पण मुंबई जिल्हा संघटनेने या शरीरसौष्ठवाच्या गौरवाची स्पर्धा घ्यायलाच हवी होती. तसेच राज्य संघटनाही ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धा आयोजित करण्यात तोंडघशी पडलीय. त्यांनी ही स्पर्धा टाळून तमाम मुंबईकरच नव्हे, तर महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंचा अपमान केला आहे. जर संघटनेला मुंबई श्रीबद्दल जरा जरी आदर असेल तर त्यांनी या प्रतिष्ठत स्पर्धेचे आता तरी आयोजन करावे आणि खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे.
– विकी देसाई,
माजी आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपट

आम्ही अपयशी ठरलो
संघटनेत पडलेली फूट आणि त्यानंतर स्पर्धेच्या आयोजनासाठी लागणारी तयारी करण्यात आमचे नवे पदाधिकारी कमी पडले. आम्ही ‘मुंबई श्री’च्या आयोजनासाठी प्रयत्न केले, पण ते तोकडे पडले. मात्र आम्ही पुढच्या वर्षी मोठय़ा जोमाने भव्य आणि दिव्य ‘मुंबई श्री’चे आयोजन करू.
– अमोल कांबळी, सरचिटणीस (मुंबई जिल्हा शरीरसौष्ठव संघटना)

किंग मास क्लासिकलाच केले राज्य निवड चाचणी
यंदा मुंबई श्रीसुद्धा घेता येणार नाही आणि महाराष्ट्र श्रीसुद्धा रंगणार नाही याचे संकेत जिल्हा आणि राज्य संघटनेला काही दिवस आधीच मिळाले होते. त्यामुळे संघटनेने मनीष आडविलकरने आयोजित केलेल्या किंग मास क्लासिक स्पर्धेलाच शेवटच्या क्षणी राज्य निवड चाचणीचे कपडे घातले आणि लुधियाना येथील 15 व्या मि. इंडियासाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर केला.

चार-चार संघटना की दुकानं?
मुंबईतच नव्हे, तर महाराष्ट्रात शरीरसौष्ठवाच्या कागदावर चार-चार संघटना आहेत. पण यापैकी दोन संघटनांच्या जिल्हा आणि राज्य स्पर्धा कधी होतात याची माहिती खुद्द संघटनेलाही नसते. स्पर्धा आयोजित करता येत नसल्या तरी चार संघटना अस्तित्वात आहेत आणि या संघटना नसून शरीरसौष्ठवाचे दुकान आहेत. या संघटना खेळ आणि खेळाडूंच्या भल्यापेक्षा संघटकांच्याच दुकानदारीसाठी थाटलेले दुकान असल्याची जळजळीत प्रतिक्रिया खुद्द संघटकच देतात. या संघटनांपैकी दोन संघटनांनी तरी आपल्या स्पर्धा घेतल्या तरी खेळाडूंचे भले होईल.