ऑस्ट्रेलियाच्या करारबद्ध यादीत धक्के, वॉर्नरसह पाच दिग्गजांचा पत्ता कट; 23 खेळाडूंची यादी जाहीर

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आगामी मोसमासाठी 23 करारबद्ध क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली असून त्यात काही धक्केही दिले आहेत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी सज्ज असलेल्या डेव्हिड वॉर्नरसह मार्कस स्टॉयनिस, अॅश्टन एगर या अष्टपैलूंना करारबद्ध यादीतून वगळले आहे. मात्र मॅट शॉर्ट, एरॉन हार्डी आणि झेव्हियर बार्टलेट या युवा खेळाडूंची निवड करताना आपल्या भविष्याचा विचारही केल्याचे दिसले आहे.

बार्टलेट आणि एलिसही करारबद्ध

वेगवान गोलंदाज झेव्हियर बार्टलेट आणि नॅथन एलिस हे प्रथमच करारबद्ध झाले आहेत. तसेच मॅट शॉर्ट आणि एरॉन हार्डीही करारबद्ध यादीत सामावलेले नवे चेहरे आहेत. या चौघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्यांच्या कामगिरीपासून निवड समिती प्रभावित झाली होती. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी दिली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2024-25 साठी करारबद्ध केलेले क्रिकेटपटू

सीन एबॉट, झेव्हियर बार्टलेट, स्कॉट बोलंड, अॅलेक्स पॅरी, पॅट कमिन्स, नॅथन एलिस, पॅमरून ग्रीन, एरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रव्हिस हेड, जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, झाय रिचर्डसन, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि अॅडम झम्पा.

वॉर्नर, स्टॉयनिस, एगर बाहेर

कसोटी आणि वन डे क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या डेव्हिड वॉर्नरला टी-20 वर्ल्ड कपनंतर या वेगवान क्रिकेटलाही गुडबाय करायचे आहे, पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्या आधीच त्याचा आगामी करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून पत्ता कट केला आहे. तसेच अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस, अॅश्टन एगर यांनाही त्यांनी बाहेर ठेवण्याचे धाडस दाखवले आहे. स्टॉयनिसला वगळण्याचा प्रकार धक्कादायक आहे. तो आणि वॉर्नर सध्या आयपीएलमध्ये खेळतोय आणि दोघांनाही टी-20 वर्ल्ड कप खेळायचे आहे. त्यांना वगळण्याच्या निर्णयानंतरही दोघांना थेट वर्ल्ड कपसाठी संधीही दिली जाऊ शकते. 23 खेळाडूंच्या यादीतून मार्कस हॅरिस आणि मायकल नेसर हे युवा खेळाडूही गायब झाले आहेत.