World Cup 2023 – विराट-राहुलचा स्वर्गानंदी खेळ

>> द्वारकानाथ संझगिरी

2023 च्या  विश्वचषक स्पर्धेची आपली सुरुवात देदीप्यमान झाली. केवळ ऑस्ट्रेलियाला हरवणं हे त्याचं कारण नव्हतं. कुठे 3 बाद 2 आणि मग कुठे 4 बाद 201.! सुताने स्वर्ग गाठला अशी म्हण आहे. विराट आणि राहुलने पाताळातून स्वर्ग गाठला. विराटचा मार्शने सोडलेला झेल यापुढे काही काळ तरी मिचेल मार्शला स्वप्नात सतावणार…

हिंदुस्थानमध्ये पाठलाग करून जिंकून देणारा विराटपेक्षा चांगला फलंदाज पूर्वी नव्हता, आज नाही. पण उद्या नसणार नाही असं मी म्हणणार नाही. के. एल. राहुल कालच्या खेळीतून बरंच काही शिकला असेल. विराटबरोबर त्याने अत्यंत दर्जेदार अशी विजयी भागीदारी केली आणि तोडीसतोड फलंदाजी केली.

विराट 1 बाद 0 परिस्थितीत खेळायला आला. दोघांनी 3 बाद 2 अशी दारिद्रय़रेषेखालची परिस्थिती पाहिली. विराट 12 धावांवर असताना आणि हिंदुस्थानची धावसंख्या 20 वर असताना विराटचा आकाशात गेलेला पुल पाहून दोघांच्याही छातीचे ठोके चुकले नसतील तर ते रोबो आहेत. पण तिथून त्यांनी शांतपणे भागीदारीचा पाया घातला. सुरुवातीला धोका न पत्करता धंदा केला आणि धंद्यात भरभराट झाल्यानंतर काही अप्रतिम फटक्यांनी आपल्या डोळय़ाचं पारणं फेडलं. दोघांत उजवं-डावं ठरवणं कठीण होतं. पहिल्यांदा त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी लावलेली आग शांत केली. मग विझविली. मुख्य म्हणजे ज्या आपल्या फिरकी गोलंदाजांनी विजयाचा हायवे तयार केला होता, वाईट एवढंच वाटलं की, ना विराटच शतक झालं, ना राहुलचं. अशा वेळी विराट सहसा आपली शतकाबरोबरची अपॉइंटमेंट चुकवत नाही. त्याच्यासाठी तो पुलचा दिवस नव्हताच आणि पंडय़ाचा षटकार राहुलच्या शतकावर पाणी फेरून गेला. पंडय़ाने रनरेट वाढवायला षटकार ठोकला आणि राहुलला आयुष्यात प्रथम चौकाराऐवजी षटकार मिळाला याचं वाईट वाटलं असेल. पण नशिबाला काहीवेळा कारण नसताना तिट लावायची सवय असते.

आज ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फलंदाजी घेतली. पण अधिक फलंदाजाच्या प्रेमात न पडता हिंदुस्थानी संघाने फिरकीचे तीन एक्के संघात घेतले आणि गोलंदाजीचा डाव त्यांनी जिंकून दिला. चेन्नईच्या खेळपट्टीनेही आपल्या परंपरेचा मान राखला. तिने फिरकी गोलंदाजांना माया दाखवली. बुमरा दुखापतीतून परतताना पूर्वी होता तसाच परतला आहे. तोच वेग, तोच बाऊन्स, तोच टप्पा, तेच यॉर्कर्स. त्याने ‘हर्क्युलस’ मार्शला चीत करायला बाण नाही, अस्त्र्ा सोडलं. पण फिरकी गोलंदाज लवकर आले. कारण खेळपट्टीचा कल जाणवायला लागला होता. ऑस्ट्रेलियाने 50 धावा 64 चेंडूंत आणि 25 षटकांत 2 बाद 110 पर्यंत मजल मारली, पण त्यानंतर ब्रेक लागले. कारण तिन्ही फिरकी गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी टाकली.

कुलदीपने त्याच्या गोलंदाजीत झालेली सुधारणा जगापुढे ठेवली. हवेतून चेंडू वेगात आला तरी त्याच्या टर्नवर परिणाम झालेला नाही आणि त्याने फ्लाईटवर वॉर्नरला फसवण्याची किमया दाखवली. पण महत्त्वाची विकेट होती मॅक्सवेलची. त्याच्यावर फिरकीला उद्ध्वस्त करायची जबाबदारी ऑस्ट्रेलियाने टाकलीय. त्याच्या मुसक्या बांधल्या गेल्या आणि कैदेतून बाहेर पडण्यासाठी त्याने आडवा फटका मारला, पण वेगात आलेला चेंडू त्याचे स्टंप्स उद्ध्वस्त करून गेला. पण त्यांना खऱया अर्थाने आगीत ढकललं जाडेजाने. त्याने 2 षटकांत 3 विकेट्स घेतले. जाडेजा चेंडू वेगात टाकतो. कधी ताशी 100 नेही येतो. पण मध्येच थोडा हळू सोडलेल्या चेंडूला विकेट मिळतात. त्याचे दोन चेंडू उत्तम होते. एक आत्मविश्वासाने खेळत असलेल्या स्मिथला टाकलेला. लेगस्टंपवर पडून ऑफस्टंप घेऊन गेला. दुसरी कॅरीची विकेट. डावखुऱया कॅरीला तो राऊंड द विकेट टाकत होता. तिथून पायचीत मिळणं कठीण. पण चेंडू त्या कोनातून स्टंपवर आला. जाडेजा चेन्नईच्या खेळपट्टीचा दत्तकपुत्र आहे. आयपीएलमुळे तो दत्तक गेला. त्याची अचूकता अशी आहे की, तो नाण्यावरसुद्धा 22 यार्डावरून चेंडू टाकू शकेल. अश्विननेही चांगली गोलंदाजी टाकली. खेळपट्टी सरळ साधी नव्हती. म्हणून 200 धावा वाढलेलं पक्वान्नांचं ताट नव्हतं.

या पक्कान्नाने पहिल्याच दोन-तीन घासात हिंदुस्थानी संघाचं तोंड भाजलं. स्टार्क हा महान गोलंदाज आहे. 145 ते 150 च्या वेगाने तो चेंडू टाकतो. चेंडू चांगला स्विंग करतो. त्याचा वाईड चेंडूसुद्धा विकेट देतो. किशनने ते सिद्ध केलं. हेझलवूड चेंडू सीम करतो. त्याचा सातव्या स्टंपवरचा चेंडू रोहितला मोठय़ा ऑफब्रेकसारखा डसला आणि अय्यरने चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाने कसं खेळू नये त्याचा धडा वाचून दाखवला. हिंदुस्थानी वन डेच्या इतिहासात पहिले तीन फलंदाज शून्यावर कधी बाद झाले नव्हते.  4 बाद 20 अशी अवस्था हिंदुस्थानी धावफलकावर झळकली असती. हेझलवूडचा बाऊन्सरवर  विराटचा उडालेला झेल कुणी टिपायचं या गोंधळात मार्शने सोपा झेल सोडला. कोहलीला जीवदान म्हणजे वाघाला पिंजऱयातून सोडणं होतं.

 त्याच्याबरोबर राहुल होता. 2 धावांवर 3 विकेट गेल्यावर दोघे एकत्र आले. दोघांनी जोखमी फटके बासनात गुंडाळले. रनिंग बिटविन द विकेटवर भरवसा टाकला. नव्या चेंडूचा स्विंग कमी झाला आणि चेपॉकच्या खेळपट्टीचं मन वळविण्याची ताकद असणारे फिरकी गोलंदाज नव्हते. झम्पाला त्या खेळपट्टीचा वापर करता आला नाही. विराट हा पाठलागाचा बादशाह आहे. टार्गेट छोटं असल्यामुळे घाई करायची गरज नव्हती. दोघांनी सर्व अनुभव पणाला लावून सामना जिंकून दिला. पण राहुल आणि विराट या दोघांची शतकं न होणं मनाला चटका लावून गेली.