28 एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत जाहीर सभा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवार 28 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जलतरण तलाव साळवी स्टॉप येथील मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेची शिवसैनिकांसह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते जय्यत तयारी करत आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. संपूर्ण मतदार संघात पहिल्या टप्प्यात खळा बैठका आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद गटनिहाय मेळावे घेण्यात आले. प्रचाराच्या पहिल्या दोन्ही टप्प्यात खासदार विनायक राऊत यांना जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

मशाल चिन्ह घेऊन शिवसैनिकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि आपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 28 एप्रिल रोजी रत्नागिरीत येत आहेत. संध्याकाळी साडेसहा वाजता जलतरण तलाव साळवीस्टॉप येथील मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. खासदार विनायक राऊत यांनी 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर ते हॅटट्रीक करण्यासाठी सज्ज झाले आहेत.