मुंबईच्या बाप्पांचे विविधांगी दर्शन, गिरगावमध्ये 160 छायाचित्रकारांचे प्रदर्शन

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना दिमाखदार विद्युत रोषणाई, उंच आकर्षक मूर्ती, भाविकांची गर्दी, पाद्यपूजन ते आगमन आणि आगमन ते विसर्जन करताना जोश आणि जल्लोष अशा सर्व टप्प्यांतून बाप्पांची अप्रतिम अशी विविधांगी छायाचित्रे मुंबईकरांना पाहता येणार आहेत. 160 छायाचित्रकारांच्या उत्कृष्ट छायाचित्रांचे आणि स्पर्धेचे आयोजन गिरगाव चौपाटीजवळ, विल्सन कॉलेज समोर असलेल्या मेकीचेन हॉलमध्ये भरणार आहे.

अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि महाराष्ट्र ट्रव्हल फोटोग्राफर संघटनेच्या वतीने जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त मुंबईच्या गणेशोत्सवावर आधारित उत्सवारंभापासून ते विसर्जनपर्यंत श्रींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन 18 ते 20 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत गिरगाव चौपाटी येथे भरणार आहे. श्रींच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन 18 ऑगस्टला संध्याकाळी 4 वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व गणेशभक्तांनी, गणेशप्रेमी आणि रहिवाशांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र ट्रव्हल फोटोग्राफर संघटना आणि मंडळाच्यावतीने कार्याध्यक्ष सुधीर साळवी आणि मानद सचिव-माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी केले आहे.

प्रदर्शन, स्पर्धेबरोबरच सुलेखन, मूर्ती प्रात्यक्षिक   

प्रदर्शन आणि स्पर्धेमध्ये 19 ऑगस्टला सकाळी 11 वाजता सुप्रसिद्ध सुलेखनकार रितेशरा देवरुखकर यांच्या सुलेखनाचे प्रात्यक्षिक तर संध्याकाळी 6 वाजता सुप्रसिद्ध मूर्तिकार संदेश नारकर यांच्या श्री गणेशमूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक होणार आहे. 20 ऑगस्टला सकाळी 11 वा. सुप्रसिद्ध मूर्तिकार अभिषेक निवेलकर यांचे श्री गणेशमूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक, संध्याकाळी 4 वाजता रेखाचित्रकार प्रकाश लहाने यांचे श्री गणेश रेखाचित्र प्रात्यक्षिक होणार आहे. अंध विद्यार्थी संध्याकाळी 6 वाजता गणेश मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत. कार्यक्रमावेळी अशोक कर्मी आणि गणाधिराज संस्थेच्यावतीने अंध विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात येणार आहे.