एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीस अटक करणार होते, संजय राऊत यांची टीका

एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे म्हणून देवेंद्र फडणवीस अटक करणार होते. त्या अटकेला घाबरून हे डरपोक लोक पळून गेले, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अकोले येथे आज खासदार संजय राऊत यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी त्यांनी शिर्डी येथे प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे नेते अनिल देसाई हे उपस्थित होते.

माध्यमांनी ईव्हीएमवरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राऊत म्हणाले की, ईव्हीएम विरोधात जनतेच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे एक प्रकारचा जनआक्रोश निर्माण झाला आहे. अनेकदा न्यायालयाने जनभावनेचा आदर करत निर्णय दिलेला आहे. या लोकशाहीत निवडणूक प्रकियेवर जनतेचा विश्वास नाही, ती लोकशाही काय कामाची?तुम्ही बॅलेट पेपर, VVPATची मागणी मान्य करत नाही. मात्र न्यायालयाने हा विषय काळजीपूर्वक समजून घ्यायला हवा होता. गेल्या अनेक वर्षांपासून लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. हा आक्रोश न्यायालयापर्यंत पोहोचला नाही, याचा अर्थ निवडणूक आयोगासह, न्यायालयावरही दबाव असू शकतो. निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वासच नाही, आमचं मत कुठ जातय हे आम्हाला कळत नाही. मतदान कोणाला आणि मत जातय कोणाला? निवडणुकीचे दोन टप्पे झालेले आहेत. त्यामुळे आता काही बोलण्यात अर्थ नाही, असं राऊत यावेळी म्हणाले.

‘या देशात नरेंद्र मोदींनी विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक केली. का? केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्यासह विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक होते. मग ज्यांची नाव मुख्यमंत्री घेताहेत, फडणवीस, दरेकर, लाड.. यांच्यावरच्या गुन्ह्यांची तुम्ही यादी जाहीर करा. तुम्ही त्यांच्यावरच्या गुन्ह्यांचा तपास का थांबवलात? देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना पोलिसांना हाताशी धरून त्यांनी बेकायदेशीरपणे विरोधकांचे फोन टॅप केले. हा जागतिक स्तरावरचा गुन्हा आहे. जगात कुठे असे घडले असते तर ते तुरुंगात दिसले असते. पण फडणवीसांनी सत्तेवर येताच तपास बंद करून टाकला. पण गुन्हा रद्द केला. मुंबई बँकेच्या घोटाळा प्रकरणी दरेकरांची चौकशी सुरू होती ती त्यांनी चौकशी थांबवली, अनेक घोटाळेबाज गिरीश महाजनांपासून सगळ्या चौकशा थांबल्या. तुम्ही कायद्याच्या वर आहात का? तुम्ही आम्हाला अटक करता, आमच्यावर गुन्हे दाखल करता. आम्हाला अटकेच्या धमक्या देता. केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्या सारख्यांना अटक करता. मग तुम्ही काय वरतून ढगातून पडले आहात का ? तुम्ही कोण आहात? कायदा हा सर्वांसाठी समान आहे. तुम्ही अद्याप संविधान बदललेलं नाही, तुम्हाला ते आम्ही बदलू देणार नाही, हे फडणवीस व शिंदे यांनी लक्षात घ्यावं. एकनाथ शिंदे तुम्ही लक्षात घ्या, ‘तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते, एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस अटक करणार होते. म्हणून ते घाबरून पळून गेले. हे डरपोक लोक आहेत. हे अटकेला घाबरले, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.