Google

अमित घोडेकर

तुम्ही काही शोधताय…? गुगलवर शोधा… आज गुगल महाजातकावरील सर्वात विश्वासू ब्रॅण्ड ठरला आहे…

नुकताच कोंन ऍण्ड वुल्फ नावाच्या एका जागतिक संस्थेने एक सर्वेक्षण केले आहे ज्यात गुगल हा हिंदुस्थानातील सगळ्यात जास्त विश्वासू ब्रॅण्ड म्हणून घोषित केले आहे, गुगलला अनेक मोठय़ा दादा देशी आणि विदेशी कंपन्यांची मोठी टक्कर असताना गुगलने सगळ्यांना मागे टाकत हा मान मिळवला आहे. गुगलच्या स्पर्धेत सोनी, मायक्रोसॉफ्ट, अमेझोन, आपली सगळ्यांची लाडकी मारुती सुझुकी आणि जगातील सगळ्यात मोठा ब्रॅण्ड ऍपल या सगळ्यांना धोबीपछाड देत अव्वल स्थान गाठले आहे.

एकीकडे जागतिक तंत्रज्ञानाच्या सारीपटावर खूप क्रांतिकारी बदल होत आहेत आणि गुगल हे बदल घडवण्यात आघाडीवर आहे त्यातच गेल्या वर्षभरापासून हिंदुस्थानात फोरजी सुरू झाल्यापासून सगळ्यांच्या हातात इंटरनेट नावाचे अस्त्र आले आहे त्यामुळेच हिंदुस्थानी लोकांचा विश्वास गुगलवर वाढला आहे. पण गुगलच्या यशात हेच काही एकमेव कारण नाही, हिंदुस्थानी लोक कोणतीही वस्तू विश्वासाच्या आधारे घेतात आणि एकंदरीत गुगलने आपला विश्वास संपादन केलाय हे म्हणायला काही हरकत नाही.

जर तुम्ही जग बदलणाऱया एखाद्या गोष्टीवर काम करत असाल तर तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक सकाळची खूप आतुरतेने वाट बघाल..  हे वाक्य आहे लॅरी पेजचे गुगलचा संस्थापक याचे.

गुगल.. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. काही वर्षांपूर्वी फक्त काही शोधायचं असेल तर आपण गुगल वापराचो नंतर कोणाला ईमेल पाठवाचा असेल तर गुगल वापरू लागलो.  एकमेकांशी संपर्क करायचा असेल तर गुगल वापरू लागलो नंतर गाडीतून प्रवास करताना मार्ग शोधायचा असेल तर गुगल वापरू लागलो. मग एखादी मोठी फाईल सुरक्षित ठिकाणी ठेवायची असेल तर गुगल वापरू लागलो असं एक एक करत काही वर्षांपासून आपला मोबाईलच गुगलचा झाला. म्हणजे तुम्ही कोणताही मोबाईल घ्या त्यात सबकूछ गुगल अगदी अल्लादिनच्या जादुई चिरागप्रमाणेच आपला मोबाईलपण आपल्याला हव्या त्या गोष्टी हव्या तेव्हा देऊ लागला..

स्टीव्ह जॉब्स एकदा म्हणाला होता की, मी एक दिवस जग बदलणार आणि त्याने ते बदललेदेखील, पण स्टीव्ह जॉब्सच्या गेल्यानंतर सध्या जग बदलायचं काम गुगल करत आहे. गुगलने कधी नव्हे ते ऍपलला सगळ्या बाबतीत मागे टाकले आहे. अगदी जवळपास सगळ्याच गोष्टी फुकटात विकून फक्त जाहिरातीच्या बळावर पैसे कमावता येतात हे गुगलने सिद्ध करून दाखवले आहे. नाही म्हणायला काही गोष्टी ते पैसे घेऊन विकतात, पण गुगल भांडवलशाही मनोवृत्तीमधून कुठलाही व्यवसाय करत नाही, तंत्रज्ञान स्वस्तात कसे देता येईल हा एकमेव उद्देश समोर ठेवून व्यवसाय करणे हे गुगलचे एकमेव उद्दिष्ट आहे आणि त्यात ते खूप मोठय़ा प्रमाणात यशस्वी झाले आहेत.

स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत असताना लॅरी पेज आणि सर्जाइ बिन या दोघांनी मिळून ‘गुगल’ या जगातील पहिल्या वहिल्या सर्च इंजिनची सुरुवात केली. खरंतर गुगलचे सर्च इंजिनचा व्यवसाय एवढा जबरदस्त आहे की त्याच्यामधून मिळणाऱया पैशातून लॅरी पेज आणि सर्जाइ बिन हे दोघेही त्याच्या सात पिढय़ा बसून खाऊ शकतील एवढा पैसा आरामात कमवू शकले असते, पण लॅरी पेजने गुगलच नाव अजरामर करून सोडायचा पक्का निर्धार केला आहे. त्यामुळेच गुगलच्या अल्लादिनच्या जादुई चिरागमधून प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन येत असत जे समस्त मानव जातीसाठी एक मैलाचा दगड ठरतो असतो.

सध्या गुगल एका नवीन अफलातून गोष्टीवर काम करत आहे ती गोष्ट म्हणजे मनुष्यविरहित कार. जसं आपण रिक्षा किंवा टॅक्सीचा वापर करून एका ठिकाणावरून दुसरीकडे प्रवास करतो तसेच ही गुगलकार तुम्हाला एका मेसेज वर हवे त्या ठिकाणी पिकअप करेल आणि हवे त्या ठिकाणी सोडेल. आता बघुयात लॅरी पेज आणि गुगलची येणारी नवीन कार भविष्यात आपल्याला काय चमत्कार करून दाखवते.