छोटीशी गोष्ट – भित्रोबा!

>>सुरेश वांदिले

अधूनमधून वाघोबा महाराज दरबार भरवायचे. या दरबारात पंतप्रधान कोल्होबा, सेनापती अश्वसिंगांसह अष्टप्रधान मंडळ असायचे. वननगरी अधिक सुखी आणि संपन्न झाली पाहिजे, यावर वाघोबा विचारविनिमय करत.

वननगरी पूर्वीसारखी राहिली नव्हती. पूर्वी अधूनमधून शिकारीसाठी येणाऱया मनुष्यप्राण्यांशिवाय वननगरीत केवळ प्राणीच वास्तव्याला होते. मात्र हळूहळू मनुष्यप्राण्याने वननगरीत आक्रमण केले. त्याचं जाणं-येणंही खूप वाढलं. प्रारंभी हे सगळं वाघोबांना जड गेलं. पण मग त्यांच्या लक्षात आलं की, आपणास आता मनुष्यप्राण्यांसोबतच रहावं लागणार. तसं त्यांनी दरबारी आणि प्रजाजनांना समजावून सांगितलं. सर्वांना त्यांचं म्हणणं पटलं. तेसुद्धा वननगरीत मनुष्यप्राण्याच्या सतत येण्याला आणि राहण्याला सरावले.

पण नंतर मनुष्यप्राण्याची हाव वाढत गेली. तो अधिकाधिक शिकार करू लागला. त्यात त्याला पराक्रम वाटू लागला. वाघोबांचे कित्येक नातेवाईक त्याने ठार केले. गजराजाची हत्या करण्यापर्यंत त्याची मजल गेली. काही पक्षी आणि प्राण्यांची शिकार करून त्यांना खाऊ लागला. हे थांबवण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही, याचं दुःख वाघोबांना व्हायचं. एकटे असताना ते अश्रू ढाळत. इतरांच्या लक्षात येऊ नये यासाठी मात्र ते दक्ष असत.

मनुष्यप्राण्याची ही हाव अशीच वाढत राहिली तर सगळे प्राणी-पक्षी नष्ट होतील ही चिंता त्यांना भेडसावू लागली. यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी आजचा दरबार बोलावला. बैठकीत, प्रारंभी त्यांनी त्यांच्या काळजीचा विषय सांगितला. मनुष्यप्राण्याला लगाम कसा लावायचा यावर बरेच विचारमंथन झाले. पण या चर्चेनंतर लक्षात आलं की, मनुष्यप्राणी जसा दुष्ट आहे, तसाच हुशारसुद्धा! त्याच्याशी एकटय़ाने जसं लढू शकत नाही, तसंच सगळे मिळूनही लढू शकत नाही.

“पण आपण काहीच केलं नाही तर लवकरच नष्ट होऊन जाऊ.’’ वाघोबांनी लक्षात आणून दिलं. कोणालाच काही सुचेना तेव्हा या बैठकीला विशेष निमंत्रित म्हणून आलेल्या वाघोबांच्या मावश्या काळी मनी आणि पांढरी माऊ म्हणाल्या, “आम्ही उपाय सांगू का?’’

“भाच्या, कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती आणि युक्तीपेक्षा भीती मोठं शस्त्र ठरतं. हा मनुष्यप्राणी बुद्धिमान असला तरी भित्राही तेवढाच! या त्याच्या भीतीचा उपयोग आपल्या संरक्षणासाठी करायचा.’’ काळी मावशी म्हणाली.
“म्हणजे गं, काय करणार?’’

“ते आम्ही करू. यामुळे तो खूप शहाणा होईल, आपली शिकार थांबेल असं नाही. पण त्याच्या अशा वागण्याला थोडातरी धक्का बसेल.’’
“पण, तुम्ही काय करणार ते सांग ना?’’ वाघोबांनी दोन्ही मावश्यांकडे बघत विचारलं.’’

काळी मावशी म्हणाली, “आम्ही मनुष्यप्राण्यांच्या वस्तीत जातो. जेव्हा जेव्हा शक्य होईल, तेव्हा तेव्हा त्याला आडवं जाऊ. आम्ही आडवं गेलं की, वाईट होतं, काळा रंग त्याला अशुभ वाटतो. त्यामुळे त्याला आमच्या आडव्या जाण्याची भीती वाटेल. या भीतीपोटी तरी तो जंगलात यायचा कमी करेल. शिकार कमी करेल.’’

पांढरी आणि काळय़ा मावशीने सांगितलेला उपाय दरबाऱयांना पटला नाही. मात्र हा उपाय करून बघायला हरकत नसल्याचं वाघोबांनी बोलून दाखवलं. काळी मावशी आणि पांढरी मावशी मग मनुष्यप्राण्यांच्या जगात आल्या. पांढऱया मांजरीने मनुष्यप्राण्याला लळा लावला आणि काळय़ा मांजरीने सतत आडवे जाण्याचे व्रत घेऊन जमेल तशी आडवी जात राहिली. मनुष्यप्राण्याच्या मनात भीती निर्माण करत राहिली. त्यामुळे प्राण्यांच्या बाबतीतल्या मनुष्याचा वागणुकीत फरक पडला नाही. मात्र त्याच्या मनात वाघोबांबद्दल जितकी भीती नसेल त्याच्या पन्नासपट भीती काळय़ा मांजरीच्या आडव्या जाण्याची भरली. वाघ दिसल्यावर एखादेवेळेस त्याला धडकी भरणार नाही. पण काळी मांजर आडवी गेली तर धडकी भरणारच नाही असा मनुष्यप्राणी विरळाच!