कामाची बातमी! मतदानकार्ड नसतानाही तुम्ही मतदान करू शकता, कसे ‘ते’ एका क्लिकवर जाणून घ्या…

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 5 जागांसह देशभरातील 102 जागांवर उद्या 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडेल. जन्मस्थळ सोडून कर्मस्थळी आलेले अनेकजण मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने मतदानासाठी आपापल्या गावी किंवा राज्यात परततील. मात्र घाईने निघाल्यामुळे एखादवेळी मतदानकार्ड घरी किंवा रुमवर विसरू शकते, त्यामुळे मतदान कसे करावे हा प्रश्न पडणे साहजिक आहे. त्यामुळे अगदीच घाबरून जाऊ नका, कारण मतदानकार्डशिवायही तुम्ही मतदान करू शकता. यासाठी तुमच्याकडे खालीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र असायला हवे.

आधारकार्ड – आजच्या घडीला आधारकार्ड ही काळाची गरज झाली असून जवळपास सर्वांकडे ते आहे. निवडणूक आयोगानुसार आधारकार्डचा वापर मतदान करण्यासाठी ओळख म्हणून करता येऊ शकतो.

पासपोर्ट – देशाबाहेर जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते. परंतु याचा ओळखपत्र म्हणूनही वापर होतो. तुमच्याकडे पासपोर्ट असले तरीही तुम्ही मतदान करू शकता.

पॅनकार्ड – तुमच्याकडे पॅनकार्ड असले तरीही तुम्हाला मतदान करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मतदान करण्यासाठी हा देखील एक Voter ID Card चा पर्याय आहे.

ड्रायव्हींग लायसन्स – रस्त्यावर वाहने चालवण्यासाठी दिले जाणारे ड्रायव्हींग लायसन्स देखील ओळख म्हणून पुरावा देऊ शकता आणि मतदान करू शकता.

मनरेगा जॉब कार्ड – बऱ्याच जणांना मनरेगा जॉब कार्ड देखील ओळख म्हणून मतदान केंद्रावर चालते याची माहिती नाही. परंतु हा एक सरकारी पुरावाच आहे.

फोटोसह असणारे पासबूक किंवा पोस्टबूक – खाते उघडताना बँकेकडून मिळालेले पासबूक किंवा पोस्टातील बूक ज्यावर फोटो आणि अधिकृत शिक्का आहे त्याचाही वापर ओळख म्हणून होतो.

या व्यतिरिक्त केंद्र किंवा राज्य किंवा पीएसयू किंवा पब्लिक लिमिटेड कंपन्यांद्वारे आपल्या कर्मचाऱ्याना दिलेले ओळखपत्र (फोटोसह), एनपीआरद्वारे दिलेले स्मार्टकार्ड, लेबर मिनिस्ट्री स्कीमअंतर्गत देण्यात आलेले हेल्थ इन्श्यूरन्स स्मार्ट कार्ड, फोटोसह असणारी पेन्शनची कागदपत्रे, खासदार किंवा आमदार किंवा नगरसेवकांनी जारी केलेले ओळखपत्र देखील मतदानासाठी ग्राह्य समजले जाते.