जगभरातून महत्त्वाच्या बातम्या

कोलंबिया, हार्वर्ड विद्यापीठांत निदर्शने

इस्रायलविरोधी आंदोलन आता अमेरिकेपर्यंत पोहोचले आहे. येथील अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांत पॅलेस्टाईन समर्थकांची निदर्शने सुरू आहेत. हार्वर्ड विद्यापीठात आंदोलकांनी पॅलेस्टिनी ध्वज फडकवले असून पोलिसांनी सुमारे 275 समर्थकांना अटक केली आहे. बोस्टनमधील नॉर्थ-ईस्टर्न विद्यापीठातून 100 आंदोलकांना, सेंट लुईसमधील वॉशिंग्टन विद्यापीठातून 80, ऑरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधून 72 आणि इंडियाना विद्यापीठातून 23 जणांना अटक करण्यात आली. हार्वर्ड विद्यापीठातील आंदोलकांनी आयव्ही लीग शाळेत पॅलेस्टिनी ध्वज फडकवला. मुळात ही जागा सामान्यतः अमेरिकन ध्वजासाठी राखीव ठेवलेली असते. न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात गेल्या आठवडय़ात हा विरोध सुरू झाला. या वेळी पॅलेस्टाईन समर्थकांनी रॅली काढली होती. शेकडो विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले. पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांना अटकही केली होती.

अमेरिकेतील एकाच वेळी 35 चक्रीवादळे

अमेरिकेतील आयोवा आणि ओक्लाहोमा या राज्यात एकाचवेळी 35 हून जास्त चक्रीवादळे आली. या चक्रीवादळात चार जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. येथील बहुतांश इमारती उद्ध्वस्त झाल्या असून आतापर्यंत पाच हजारांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. आयोवा आणि ओक्लाहोमामध्ये वादळामुळे 500 हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या शहरात 20 हजारांहून अधिक लोकांना विजेविना जगावे लागले आहे. शनिवार आणि रविवार दरम्यान एकाच वेळी 35 चक्रीवादळांची नोंद झाली.

हिंदुस्थानी तरुणाला 16 वर्षांची शिक्षा

ब्रिटनमध्ये एक्स गर्लफ्रेंडची हत्या करणाऱया हिंदुस्थानी तरुणाला 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. हैदराबाद येथील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय श्रीराम अंबरला याने दोन वर्षांपूर्वी आपली एक्स गर्लफ्रेंड सोना बिजू हिची हत्या केली होती. गुन्हा करण्यापूर्वी त्याने गुगलवर सर्च केले होते की, एखाद्या व्यक्तीला चाकूने कसे मारले जाऊ शकते. सोना हिने लग्नाला नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या श्रीराम अंबरने तिची निर्घृणपणे हत्या केली. अंबरला आणि सोना 2017 मध्ये एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते.

हवाहवाई! 24,275 अधिक उड्डाणे

उन्हाळी सुट्टय़ा आणि लोकसभेच्या निवडणुकीमुळे देशभरात विमान प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे विमान पंपन्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एप्रिल ते जून यादरम्यान देशभरात 24,275 विमाने अतिरिक्त विमान उड्डाणे केली जाणार आहेत. उड्डाणांचे उन्हाळी वेळापत्रक नागरी उड्डाण मंत्रालयाच्या देखरेखीत तयार करण्यात आले आहे. अतिरिक्त देशांतर्गत उड्डाणे निश्चित करण्यात आली आहेत. नियमित उड्डाणांव्यतिरिक्त 13 एअरलाईन्स अतिरिक्त उड्डाणे चालवली जाणार आहेत.