निवडणूकीचा असाही फायदा! मोडकळीस आलेल्या 196 शाळांची होणार दुरूस्ती

>> दुर्गेश आखाडे

वारंवार मागणी करूनही शाळा दुरूस्तीची कामे रखडली होती. लोकसभा निवडणूकीमुळे दुरूस्ती रखडलेल्या शाळांचा फायदा होणार आहे.शाळांचे मतदान केंद्रात रूपांतर होणार असल्याने त्या निमित्ताने जिल्ह्यातील 196 शाळांची दुरूस्ती होणार आहे.

शनिवारी लोकसभा निवडणूका जाहिर झाल्या आहेत. त्यापूर्वीच निवडणूकीसाठी मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. मतदान केंद्रासाठी प्रामुख्याने शाळांची निवड केली. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात येते. या जिल्हापरिषद शाळांची दुरूस्ती अनेक वर्ष रखडलेली आहे. जिल्हा परिषद शाळेत सुसज्ज मतदान केंद्र उभारणे आवश्यक असल्याने शाळांच्या दुरूस्तीचा विषय एैरणीवर आहे. निवडणूक जाहिर होताच मतदान केंद्र असलेल्या शाळा दुरूस्तीच्या सूचना देण्यात आल्या असून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

मतदान केंद्र असलेल्या 196 शाळांची दुरूस्ती होणार आहे. त्यामध्ये दापोलीतील 15 शाळा, खेड मधील 2 शाळा, चिपळूणातील 39 शाळा, गुहागरातील 42 शाळा, संगमेश्वरातील 39 शाळा, लांजा 21 शाळा, राजापूर 20 शाळा आणि रत्नागिरीतील 18 शाळांचा समावेश आहे.मतदान केंद्र सुसज्ज आणि सुरक्षित असण्यासाठी या शाळांची दुरूस्ती करण्यात येणार आहे.अनेक वर्ष दुरूस्तीची मागणी करूनही याशाळांची दुरूस्ती रखडली होती.शाळेचे मतदान केंद्रात रूपांतर झाल्याने त्यांना निमित्ताने शाळा दुरूस्तीला मुहूर्त मिळाला आहे.

अनेक शाळांची छप्पर उडाली तर काहीना दारे-खिडक्या नाहीत

मतदान केंद्र असलेल्या अनेक शाळांची छप्पर दुरूस्ती आहे.काही शाळांची दारे-खिडक्या दुरूस्त करणे आवश्यक आहे.काही ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही.अनेक ठिकाणी रॅम्प बांधणे आवश्यक आहे.मतदान केंद्र असलेल्या अनेक शाळांचा दुरूस्तीचा आढावा तयार करण्यात आला असून दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेतले जाणार आहे.दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन मधून खर्च करण्यात येणार आहे.