Rashmika Mandanna deepfake video – डीपफेक वापरून रश्मिकाचा व्हिडीओ बनविणाऱ्याला अटक

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा डीपफेक वापरून व्हिडीओ बनविणाऱ्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपीला शनिवारी आंध्र प्रदेशातून अटक केली आहे. रश्मिकाचा डीपफेक वापरून तयार करण्यात आलेला व्हिडीओ नोव्हेंबर 2023 मध्ये व्हायरल झाला होता. रश्मिकाचा चेहरा हिंदुस्थानी वंशाची ब्रिटीश इन्फ्लुएन्सर झारा पटेल हिच्या चेहऱ्यावर लावून व्हिडीओ तयार करण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

डीपफेक व्हिडीओवर रश्मिकाने सोडले मौन

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ समोर आल्यानंतर तिचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. हा व्हिडीओ एआयची मदत घेऊन बनविण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी रश्मिकाच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. रश्मिकानेही या व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली होती. रश्मिका मंदानाने सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने म्हटले होते की, “हा व्हिडीओ पाहून मी प्रचंड दुखावले गेले आहे, माझे डिपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. प्रामाणिकपणे सांगायचे तर हा असा प्रकार फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्यासारख्या प्रत्येकासाठी फार भयानक आहे. आज मी एक महिला आणि अभिनेत्री म्हणून माझे कुटुंब, मित्रमैत्रिणी आणि शुभचिंतक यांची आभारी आहे, जे माझ्यासोबत भक्कमपणे उभे आहेत, पाठिंबा देत आहेत. जर माझ्यासोबत हे शाळेत आणि क़ॉलेजमध्ये असताना असे काही घडले असते तर मी त्या परिस्थितीतून कशी बाहेर पडले असते? आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अशा बनावट गोष्टींचा फटका बसण्याआधी लवकरात लवकर कारवाई करण्याची गरज आहे.”