विदर्भात आज मतदान असताना वर्ध्यात मोदींची प्रचार सभा कशी? नागपूरच्या मतदारांवर प्रभाव पडण्याची शक्यता

मतदानाच्या दिवशी मतदार प्रभावीत होतील अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आहे. त्यानंतरही नागपूरपासून काही अंतरावर असलेल्या वर्धा जिह्यात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमुळे उद्या नागपूर लोकसभेसाठी मतदान करणाऱया मतदारांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या सभेला परवानगी कशी देण्यात आली, अशी विचारणा होत आहे.

मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी जाहीर प्रचार थांबवला जात असला तरी छुपा आणि अप्रत्यक्ष प्रचार सुरू असतो. पण कुठेही जाहीर प्रचार केला जात नाही. पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांत उद्या 19 एप्रिलला मतदान होत आहे. या दरम्यान नागपूर लोकसभा मतदारसंघापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या वर्धा लोकसभेतील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी उद्या विदर्भाच्या दौऱयावर येणार आहेत. वर्धा येथील सभा झाल्यावर मोदी नागपूरमध्ये मुक्काम करणार आहेत. त्यांना यासाठी परवानगी कशी देण्यात आली, अशी विचारणा विरोधकांकडून होत आहे.