पंकजा म्हणाल्या, मला दिल्लीला जायची हौस नाही

मला दिल्लीला जायची हौस नाही पण यंदाची निवडणूक ही महायुद्धासाठी असल्यानेच भारतीय जनता पक्षाने रथी-महारथींना रिंगणात उतरवले आहे, साधे युद्ध असते तर मला उमेदवारी दिली नसती, असे वक्तव्य भाजपच्या बीड लोकसभेतील उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज केले.

भाजपामध्ये सातत्याने डावलले जात असल्याचा आरोप लोकसभेची उमेदवारी मिळण्यापूर्वी पंकजा मुंडे यांच्याकडून अनेकदा जाहिररित्या केला गेला होता. लोकसभेची उमेदवारीही केवळ आपली गरज वाटली म्हणून भाजपने दिल्याचे त्या आज बीड येथील प्रचारसभेमध्ये म्हणाल्या. निवडणुकीसाठी आपण कुठेही उमेदवारी मागायला गेलो नव्हतो किंवा कोणाचेही पत्र घेऊन कुठल्या नेत्याच्या घरी गेलो नव्हतो. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकारिणीत आपली उमेदवारी ठरवली, कारण जनतेला दिलेला शब्द पाळणारा उमेदवार भाजपला हवा होता, असा दावा पंकजा मुंडे यांनी केला.

यंदाची निवडणूक बीड जिह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाची असल्याने सर्वांनी मिळून योगदान द्या असे आवाहन त्यांनी बीडवासियांना केले. जिह्याला ही संधी पुन्हा मिळणार नाही, त्यामुळे खासदार म्हणून मला दिल्लीत पाठवा असे त्या म्हणाल्या. खासदार झाल्यावर यापूर्वी झाला नाही इतका जिह्याचा विकास करून दाखवेन आणि पाच वर्षानंतर जनता म्हणेल त्याला आपण खासदार करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

कुणाचेही आडनाव न विचारता कामे करेन

निवडून आल्यावर आपल्याकडे कुणीही कामासाठी आले तर त्याचे आडनाव न विचारता आपण त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू, असे वचनही पंकजा मुंडे यांनी यावेळी दिले आणि जिह्याला अशी संधी पुन्हा मिळणार नाही याचा विचार करा याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.