सध्याचा रावण अजिंक्य आहे हे डोक्यातून काढून टाका! संजय राऊत यांचे तडाखेबंद भाषण

नाशिकमध्ये शिवसेनेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाअधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सातपूर येथील हॉटेल डेमॉक्रॉसी या महाअधिवेशनाला सुरुवात झाली असून यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तडाखेबंद भाषण केले. रामायण या विषयाभोवती फिरणारे त्यांचे भाषण होते ज्यातून त्यांनी सद्यपरिस्थिती शिवसैनिकांसमोर मांडली. रामायण अयोध्येत कमी आणि पंचवटीत जास्त घडलं, रामाने जे अतुल्य धैर्य दाखवलं ते पंचवटीत दाखवलं. शुर्पणखेचे नाक कापले ते या पंचवटीत कापले गेले आहे. रावणाविरोधात युद्धाची जी प्रभू श्री रामाने तुतारी फुंकली ती या पंचवटीतूनच फुंकली होती, म्हणून हे अधिवेशन महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.

आज जागोजागी रावणच दिसतायत

संजय राऊत यांनी भाषणात म्हटले की, “राम आला की रावण येतो. तेव्हा एकच रावण होता आज आपल्याला 25-30 वर्षात जागोजागी रावणच रावण दिसतायत. आजचा रावण अजिंक्य आहे असं आपल्याला वाटतं. तो रावणही अजिंक्य नव्हता त्याला बालीने हरवलं होतं. बालीने रावणाची बगलेत पकडून धिंड काढली होती आणि त्याला किल्ल्यावर आपटून त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे सध्याचा रावण अजिंक्य आहे हे डोक्यातून काढून टाका. हे सत्य आहे, ते सत्य होणार आहे कारण मी रामभक्त आहे. “

राऊत यांनी पुढे म्हटले की,”रामाकडे उत्तम नेतृत्वगुण होता, त्याने सामान्यातल्या सामान्याला नेता बनवला. आपल्या सहकार्यांवर विश्वास ठेवा, ते ताकदीचे आहे. इतके सगळे हनुमान समोर बसलेत, आम्ही आहोत. हनुमान जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेत पोहोचला तेव्हा हनुमानाला अटक झाली. रावणाचे सैनिक त्याला रावणाच्या दरबारात नेले. हनुमानाला रावणाचा कॉन्फीडन्स लूज करायचा होता. त्यातून पुढचे प्रसंग घडले. कोण भाजप, कोण नरेंद्र मोदी, कोण देवेंद्र फडणवीस, कोण अजित पवार, कोण एकनाथ मिंधे, कॉन्फीडन्स लूज करा. रावणाचा कॉन्फीडन्स हनुमानाने तोडला, म्हणून रावण रामाकडून पराभूत झाला. “