अमेरिका, जर्मनीनंतर आता संयुक्त राष्ट्राचीही केजरीवाल यांच्यावर प्रतिक्रिया

हिंदुस्थानसह जगभरात अनेक ठिकाणी निवडणुका होऊ घातल्यात. त्यामुळे जनतेच्या राजकीय आणि नागरी हक्कांचे रक्षण होईल, प्रत्येकाला मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात मतदान करता येईल, अशी आशा आहे, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेप्रकरणी आता संयुक्त राष्ट्रानेही प्रतिक्रिया दिली आहे. याआधी अमेरिका आणि जर्मनीने कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना अटक केल्यानंतर या खटल्यावर आपले लक्ष आहे, निष्पक्ष, पारदर्शक आणि कायदेशीर प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली जाईल अशी अपेक्षा आहे, असे म्हटले होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली असून विरोधी पक्ष काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहे, त्यामुळे हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणावर राजकीय उलथापालथ झाल्याचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटेनियो गुटेरस यांचे प्रवत्ते स्टीफन दुजारीक यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी प्रतिक्रीया दिली. हिंदुस्थानात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या देशाकडून आपल्याला प्रचंड अपेक्षा आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाच्या राजकीय आणि नागरी हक्काचे संरक्षण होईल. प्रत्येकजण मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात मतदान करू शकेल अशी आशा आहे, असे ते म्हणाले. गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हिंदुस्थानातील सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल भूमिका मांडली.

व्हॉट्सअॅप मॅसेज पाठवा

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी आज मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात व्हॉट्सअॅप मोहीम सुरू केली. ‘केजरीवाल को आशीर्वाद’ या मोहिमेत जनतेच्या सहभागासाठी आवाहन करण्यात आले आहे.

हिंदुस्थान काय म्हणाला होता?

हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जयस्वाल यांनीही गुरुवारी सायंकाळी देशाची भूमिका स्पष्ट केली. हिंदुस्थान आपल्या न्यायव्यवस्थेत कुणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही, देशातील निवडणूक प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत राहूनच केली जाते. कोणताही मित्र देश, विशेषतः ज्या देशात लोकशाही आहे, त्या देशाला या कायदेशीर प्रक्रीयेचा आदर करण्यास कोणतीही अडचण नसावी. आम्हाला आमच्या कायदेशीर व्यवस्थेचा अभिमान आहे, अशा शब्दांत हिंदुस्थानचे मत मांडले. अमेरिका आणि जर्मनीने केलेल्या वक्तव्यावर हिंदुस्थानने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.