आरोग्य – पावसाळ्यात काळजी ऑस्टियोआर्थ्रायटिसची

डॉ. प्रमोद भोर  

जगभरातील लाखो लोक ऑस्टियोआर्थ्रायटिसच्या समस्येने त्रस्त आहेत. ऑस्टियोआर्थ्रायटिसचे व्यवस्थापन पावसाळ्यात कठीण होते. या कालावधीत आर्द्रतेमुळे सांधेदुखी आणि स्नायूंमधील ताठरता वाढवते आणि त्यामुळे रुग्णांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जीवनशैलीत काही साधे बदल करून या आजाराचे व्यवस्थापन करता येते, हे या लेखाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

सांध्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी वजन नियंत्रणात राखणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये व्यायाम न करणे तसेच अतिरिक्त कॅलरीजचे सेवन करणे आरोग्यावर दुष्परिणाम करते. ताजी फळे व भाज्या, प्रथिने, तृणधान्य आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेतला तर ऑस्टियोआर्थ्रायटिसने त्रासलेल्या व्यक्ती त्यांचे वजन नियंत्रित ठेवू शकतात. हळद आणि आले आपल्या रोजच्या  आहारात वापरायला विसरू नका.

याव्यतिरिक्त पावसाळ्यात ऑस्टियोआर्थ्रायटिसची लक्षणे प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी शारीरिकरीत्या सािढय राहणे महत्त्वाचे आहे. मुसळधार पावसामुळे घराबाहेर व्यायाम करण्यास मर्यादा येऊ शकतात, परंतु आपल्या सांध्यांच्या आरोग्यासाठी घरच्या घरीदेखील अनेक व्यायाम प्रकार केले जाऊ शकतात. पोहणे किंवा वॉटर एरोबिक्स यांसारखे व्यायाम प्रकार फायदेशीर ठरतात. कारण यामध्ये सांध्यावर अतिरिक्त ताण येत नाही. याव्यतिरिक्त योगासनांचा सराव केल्यास सांध्यांची लवचिकता वाढते आणि स्नायूंना बळकटी येते.

पावसाळ्यात ऑस्टियोआर्थ्रायटिसचे व्यवस्थापन कसे कराल? 

  • पावसाळ्यात घरामध्ये हवा खेळती राहील याचा प्रयत्न करा. उच्च आर्द्रतेमुळे सांधेदुखी आणि स्नायूंमधील ताठरता वाढू शकते.
  • सांध्यातील अस्वस्थता दूर करण्यासाठी आपले घर ऊबदार राखणे महत्त्वाचे आहे. तुमच्या सांध्यांना ऊब मिळावी यासाठी रूम हीटर किंवा उबदार ब्लँकेटचा वापर करू शकता.
  • बैठी जीवनशैली टाळा आणि सािढय राहण्याचा प्रयत्न करा. दररोज प्रशिक्षक तसेच तज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम करा.
  • पावसाळ्यात निसरडय़ा रस्त्यांवर फिरणे टाळा. योग्य पादत्राणांचा वापर करावा तसेच प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केल्यास अपघाताचा धोका टाळता येऊ शकतो.
  • हॉट थेरपी वापरून वेदना आणि स्नायूंमधील ताठरता कमी करा. उदाहणार्थ गरम पाण्याच्या पिशवीने किंवा हॉट टॉवेल वापरून सांधे शेकणे. याव्यतिरिक्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्नायू आणि सांध्यांना आराम मिळतो.
  • निरोगी आणि संतुलित आहाराचे सेवन करा. आपल्या आहारात रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. तसेच अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थांचे सेवन करा. जास्त मीठ आणि प्रािढया केलेले खाद्यपदार्थ टाळा.
  • वैद्यकीय सल्ल्याने ग्लुकोसामाइन आणि कॉन्ड्रोइटिनसारख्या सप्लिमेंट्सचा वापर करा. हे सांधेदुखी कमी करण्यास आणि हाडांना बळकटी आणण्यास मदत करतात.
  • तणावाचे व्यवस्थापन करा. कारण तणावामुळे वेदना आणि अस्वस्थता वाढू शकते. तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन, आवडते छंद जोपासणे यांचा रोजच्या जीवनशैलीत समावेश करा.

 (लेखक ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत)