रेल्वेचं वेटिंग तिकीट आपोआप रद्द होतंच! इंदूरमध्ये डमी उमेदवाराची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी एका डमी उमेदवाराची याचिका फेटाळून लावली. रेल्वे तिकीट जर कन्फर्म झालं नाही तर ते आपोआप रद्दच होतं, असं उदाहरणही उच्च न्यायालयाने यावेळी दिलं.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंदूरच्या काँग्रेस पक्षाच्या डमी उमेदवार असलेल्या मोती पटेल यांनी ही याचिका दाखल केली होती. इंदूर मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार अक्षय बम यांची घोषणा झाली होती. मात्र, बम यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. बम यांच्या उमेदवारी अर्जावर डमी उमेदवार असलेल्या मोती पटेल यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मध्य प्रदेश उच्च न्यायलयाच्या इंदूर खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

नियमांनुसार काँग्रेस उमेदवाराचं नामांकन रद्द झालं किंवा त्यांनी नाव मागे घेतलं तर डमी उमेदवाराला अधिकृत उमेदवार मानलं जातं. बम यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे आपणच आता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहोत, असा युक्तिवाद पटेल यांनी आपल्या याचिकेतून केला.

हा युक्तिवाद अमान्य करत न्यायालय म्हणालं की, रेल्वेच्या वेटिंग लिस्टमध्ये जर तुमचं नाव आहे आणि तिकीट कन्फर्म झालं नाही तर ते आपोआप रद्द होतं. अशा वेळी प्रवाश्याने साधारण वर्गाचं तिकीट काढून प्रवास करावा. तसंच, या प्रकरणातही झालं आहे, असं म्हणत न्यायालयाने पटेल यांची याचिका फेटाळली. तसंच, त्यांना या प्रकारात तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडे जाण्याचे आदेशही दिले.