भाजप आमदार गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी

भारतीय जनता पक्षाचे कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरात भर पोलीस ठाण्यातच मिंधे गटाचा शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांना उल्हासनगर येथील चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गणपत गायकवाड यांची 14 फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच 11 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

शुक्रवारी रात्री उल्हासनगरमधील पोलीस स्थानकामध्ये हा गोळीबाराचा प्रकार घडला. गणपत गायकवाड यांनी पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्येच चार गोळ्या झाडल्या, त्यातील दोन गोळ्या महेश गायकवाड यांना लागल्या तर दोन गोळ्या त्यांच्या अंगरक्षकांना लागून ते जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सर्वांकर यांना अटक केली आहे.

जमिनीच्या वादातून गोळीबार

आमदार गणपत गायकवाड आणि मिंधे गटाचे महेश गायकवाड यांच्यात द्वारली गावातील एका 50 गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. गेल्या चार दिवसांपासून हा वाद विकोपाला गेला होता. महेश गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड यांना धक्काबुक्की केली. त्याची तक्रार देण्यासाठी भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे हिललाईन पोलीस ठाण्यात आले होते. त्यांच्या पाठोपाठ महेश गायकवाड त्यांच्या गुंडांसह पोहोचले. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्यासमोर दोन्ही गट बसलेले असताना त्यांच्यात राडा झाला आणि गणपत गायकवाड यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरमधून महेश गायकवाडवर गोळीबार केला.