गोरेगाव चेकनाका येथे बेस्ट बसच्या धडकेत दोघांचा मृत्यू

पावसामुळे गोरेगाव चेकनाका येथे शनिवारी मध्यरात्री एक विचित्र अपघात झाला. यात ब्रेक मारून थांबवल्यानंतरही बेस्ट घसरत रिक्षाला धडकली. यात रिक्षातील दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला, तर रिक्षाचालकाला किरकोळ दुखापत झाली.

बेस्टच्या दोन बसेस घाटकोपर बस डेपोतून शनिवारी रात्री दीड वाजताच्या सुमाराला पोईसर बस डेपोत जात होत्या. गोरेगाव चेकनाका ईस्टन एक्स्प्रेस हायवेवरून जात असताना यातील बस क्रमांक 1453 ही पुढे होती. या बसच्या चालकाने ब्रेक मारल्याने मागील बस क्रमांक 1862 या बसने तिला धडक दिली. पाऊस पडत असल्याने ब्रेक लावल्यानंतरही बस क्रमांक 1862 घसरली आणि रिक्षाला जाऊन धडकली. या दुर्घटनेत रिक्षात बसलेले जॉनी शंकरराम आणि सुजाता पंचाकी हे दोघे जखमी झाले. दोघांना जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी दोघांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.