गोदावरी नदीतून साडेसात हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू; कोपरगावात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा

कोपरगावमधील नांदुर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीतून आतापर्यंत 922 दशलक्ष घनफुट पाणी वाहत आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत साडेसात हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. मात्र, अद्यापही कोपरगावात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जून-जुलै पावसाचे मुख्य दोन महिने संपले तरी कोपरगाववर पाऊस रूसला आहे. बळीराजा दररोज सकाळी उठून आभाळाकडे टक लावून पाहतो आहे. पंजाबराव डख आणि भारतीय हवामान खात्याच्या प्रत्येक बातमीकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

जेमतेम पावसावर पेरलेली पिके जगणार की नाही, याची चिंता, दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.कोपरगाव तालुका पावसाची वाट पहात आहे.कोपरगाव तालुका गेल्या दोन-तीन वर्षांपासून अस्मानी-सुलतानी संकटाशी मुकाबला करत आहे. अशातच मागील वर्षी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम पाण्यात गेले आहेत. गतवर्षी वर्षभर पाऊस पडला, आता पावसाळ्यातच पावसाने डोळे वटारले आहेत.

तालुक्यात जून महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसाने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. या पावसाच्या जिवावर पेरणी केली होती. मात्र, पावसाने अचानक ओढ दिल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी आनंदात होता. परंतु आता अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे उगवलेली पिके पाऊस नसल्याने सुकू लागली आहेत. परिसरात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकाची लागवड व पेरणी पूर्ण केली. मागील काही वर्षापासून निसर्गाच्या दुष्टचक्रामध्ये शेतकरी सापडला आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने नैसर्गिक संकटाचे सावट तालुक्यावर अद्याप कायम आहे. सध्या ऊनसावलीचा खेळ अन् सोसाट्याचा वारा सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांचे काळीज तुटत आहे. गत आठ ते दहा दिवसांपासून रिमझिम पावसाने तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर नैसर्गिक संकटांची टांगती तलवार कायम आहे. यावर्षी तरी निसर्ग आपली अवकृपा दाखविणार नाही, अशी आशा शेतकरी बाळगून आहे.

गेल्या आठ दिवसांपासून पाऊस न झाल्याने पिके सुकू लागली आहेत. दरम्यान जुलै महिना संपण्याच्या उंबरठ्यावर आलेला असतानाही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आला आहे.दोन तीन दिवसांपासून नुसते वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. अजूनही म्हणावा तसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भरत पडली आहे. जूनच्या सुरवातीला जो काही थोडासा पाऊस झाला, त्यावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु त्यानंतर पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. विहिरींनी तळ गाठला. प्यायला देखील पाणी नाही अशी काही परिस्थिती आहे. दोन चार दिवसात पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट आहे. अशा स्थितीत शासनाने मदत करायला हवी. परिसरात पेरणी केलेला मका पावसाअभावी सुकण्याची भीती आहे.

नद्यांना अजूनही पूर आलेला नाही. आहे तोच जलसाठाही संपत चालला आहे. विहिरींनी तळ गाठण्याच्या उंबरठ्यावर असताना कोपरगाव तालुक्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. हा हंगाम तरी निदान चांगला निघावा यासाठी शेतकरी मेहनत करीत आहे, त्याला पावसाची साथ हवी आहे. तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांची पिके उभी आहेत, परंतु पाऊस झाला नाही तर ती तग धरतील का अशी परिस्थिती आहे. पाऊस झाला नाही तर द्राक्षबागांसह भाजीपाला पिकांचे नियोजन कसे करायचे, खर्च कसा भागवायचा यासह अनंत अडचणींचा डोंगर शेतकऱ्यांपुढे उभा आहे.