धावत्या दुरंतो एक्स्प्रसेमधून आरोपीने उडी मारली, पोलीस उपनिरीक्षकांसह चौघांना सक्त ताकिद

फसवणूक प्रकरणातील आरोपींना पश्चिम बंगालमधून पुण्यात घेऊन येत असताना एका आरोपीने फरासखाना पोलिसांच्या उपस्थितीत शौचालयाच्या बहाण्याने धावत्या रेल्वेतून उडी मारून पळ काढला. चार महिन्यांपूर्वी नागपूर भागात दुरंतो एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी कमालीची गुप्तता पाळण्यात आल्यानंतर आता चार दिवसांपूर्वी याप्रकरणात एका पोलीस उपनिरीक्षकासह चौघांना सक्त ताकीद अशी शिक्षा देण्यात आली असून विशेष म्हणजे यातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

ससून रुग्णालयातून ड्रग्ज तस्करी करणार्‍या प्रकरणातील म्होरक्या ललीत पाटील याने पोलिसांच्या बंदोबस्तात असताना हातावर तुरी देऊन पलायन केले. याप्रकरणी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत एका पोलीस उपनिरीक्षकांसह 9 पोलिसांचे एकाचवेळी तडकाफडकी निलंबन करण्यात आले आले आहे. दुसरीकडे आता धावत्या रेल्वेतून पोलिसांच्या ताब्यात असताना, एका आरोपीने उडी मारून पलायन केले. त्याप्रकरणात मात्र संबंधीत अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सक्त ताकीद देण्यात आल्याचे समोर आले आहे. जून महिन्यातील ही घटना आहे.

फरासखाना पोलीस ठाण्यात एका फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगाल येथे गेले होते. तेथून त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सौरभ प्रसन्नजीत माईत आणि संजय तपनकुमार जाना या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना स्थानिक न्यायालयापुढे हजर करून ट्रान्झिट रिमांड घेऊन हावडा पुणे दुरंतो एक्स्प्रेसने पुण्यामध्ये आणण्यात येते होते. हे दोन्ही आरोपी एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचार्‍यांच्या ताब्यात होते. दरम्यान आरोपी संजयकुमार जाना याने शौचालयास जाण्याच्या बहाण्याने धावत्या रेल्वेतून शौचालयाच्या खिडकीतून उडी मारली. याप्रकरणी, नागपूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी जाना हा पोलिसांना सापडलेला नाही.

…कारणे दाखवा नोटीस अन् सक्त ताकीदची शिक्षा

या प्रकरणात संबंधीत कर्मचार्‍यांची चौकशी करून सुरुवातीला एक वर्ष वेतनवाढ रोखण्याची शिक्षा प्रस्तावीत करून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्याबाबत संबंधीताना खुलासा करण्यास सांगण्यात आले. त्यांनी खुलासा सादर केल्यानंतर तो अंशतः मान्य करून त्यानंतर सक्त ताकीद अशी शिक्षा सुनावण्यात आली.

”ट्रेनमधून जाताना पोलिसांच्या ताब्यातून आरोपी फरार झाल्याप्रकरणी, आमच्याकडील नागपूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अद्याप या प्रकरणातील आरोपी मिळून आलेला नाही.”

– मनिषा काशीद, पोलीस निरीक्षक, नागपूर लोहमार्ग पोलीस ठाणे