लाचखोरीवरून अदानी समूहाची अमेरिकेत चौकशी

उद्योगपती गौतम अदानी आणि अदानी समूह यांची एका लाचखोरी प्रकरणावरून अमेरिकेत चौकशी करण्यात येत आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अमेरिकेने अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांच्या वर्तनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांच्या तपासाची व्याप्ती वाढवली आहे आणि कंपनी लाचखोरीत सहभागी होती का? याची चौकशी सुरू केली आहे. हे संपूर्ण प्रकरण एका ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

अदानी समूहाच्या कोणत्याही युनिटने किंवा कंपनीशी संबंधित असलेल्या लोकांनी ज्यामध्ये स्वतः गौतम अदानी यांचा समावेश आहे त्यांनी हा ऊर्जा प्रकल्प घेण्यासाठी हिंदुस्थानातील अधिकाऱयांना पैसे दिले होते का? याचा तपास अमेरिकन अधिकारी करत आहेत.

न्यूयॉर्कमधील वकील आणि वॉशिंग्टनमधील न्याय विभागाच्या फसवणूक युनिटद्वारे गौतम अदानी समूह यांचा तपास केला जात आहे. अमेरिकन कायदा सरकारी वकिलांना परदेशात केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यास परवानगी देतो, जे कोणत्याही अमेरिकन गुंतवणूकदार किंवा बाजाराशी संबंधित आहेत. ब्रुकलिन आणि वॉशिंग्टनमधील न्याय विभागाच्या अधिकाऱयांनी मात्र या चौकशीसंबंधी प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शविला आहे.

ऊर्जा कंपनी अझर पॉवर ग्लोबलदेखील तपासात सहभागी आहे, असे सांगितले जात आहे. अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर गेल्या वर्षीच्या सुरुवातीला अदानी समूहाच्या स्टॉक्स आणि बाँड्समध्ये मोठय़ा प्रमाणात विक्री झाली होती, ज्यामध्ये समूहाने चुकीच्या प्रशासन पद्धती, स्टॉकमध्ये फेरफार आणि टॅक्स हेव्हन्सचा वापर केल्याचा आरोप केला होता.

आम्हाला आमच्या अध्यक्षांविरुद्ध कोणत्याही चौकशीची माहिती नाही. एक व्यावसायिक समूह म्हणून आम्ही शासनाच्या सर्वोच्च मानकांचे पालन करतो. आम्ही भ्रष्टाचारविरोधात कटिबद्ध आहोत, असे अदानी समूहाने ई-मेल केलेल्या निवेदनात म्हटले.