मला तंबी देणारा अजून पैदा झाला नाही; गणेश नाईकांचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. मात्र आता ती बरीचशी दूर केली आहे, उरलेलीही आता दूर करू. याचा अर्थ मला कुणी तंबी दिली आहे असा होत नाही. मला तंबी देणारा अजून पैदा झालेला नाही, अशी खदखद व्यक्त करून ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मिंधे गटाने नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईतील भाजपमध्ये जोरदार नाराजी नाट्य उफाळून आले. गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिस्टल हाऊसमध्ये बोलावलेल्या बैठकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार धुमाकूळ घातला. नरेश म्हस्के यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे नरेश म्हस्के यांना क्रिस्टल हाऊसच्या पाठीमागील दरवाजाने पळ काढावा लागला. हे नाराजी नाट्य घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी नरेश म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक आदी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर पत्रकारांनी गणेश नाईक यांना नाराजी नाट्याबाबत विचारले असता त्यांच्या मनातली खदखद अक्षरशः बाहेर पडली. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती हे खरे आहे. मात्र ती नाराजी आता कमी होत चालली आहे. आहे ती नाराजीही कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत कोणाचाही निरोप आलेला नव्हता किंवा कोणी तंबी दिलेली नव्हती. तंबीपेक्षा प्रेमाचा निरोप चालतो. गणेश नाईक यांना तंबी देणारा अजून महाराष्ट्रात पैदा झालेला नाही, असे वादग्रस्त विधान करून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या घसरले.

म्हस्केंना फटका बसणार
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच गणेश नाईक यांच्याकडून अशी खदखद व्यक्त झाल्याने शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्याचा जोरदार फटका महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना बसण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.

पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रदेशाध्यक्षांची भेट
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून संजीव नाईक यांची उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आली होती. त्यांना प्रचार सुरू करण्यासही सांगितला होता. त्यानुसार नाईक प्रचारालाही लागले होते. चिन्ह कोणतेही असो, पण उमेदवार मीच असे त्यांनी जाहीर केले होते. मात्र ऐनवेळी हा मतदारसंघ मिंधे गटाला देण्यात आला आणि उमेदवारीची माळ म्हस्के यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे भाजपच्या नवी मुंबईतील नाराज पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे धाव घेतली आणि आपल्या पदाचे राजीनामे त्यांना सुपूर्द केले.