अदानीच्या स्वयंचलित वीज बिल भरणा केंद्रामुळे ग्राहकांची लटकंती! अनेकांना मशीन हाताळता येत नसल्याने गैरसोय

उपनगरात वीज वितरण करणाऱया अदानी इलेक्ट्रिसिटीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत वीज बिल भरणा केंद्रांवर स्वयंचलित मशीन (कियॉस्क) ठेवले आहेत. मात्र वीज बिल भरण्यासाठी येणाऱया अर्ध्याहून अधिक वीज ग्राहकांना या मशीन हाताळताच येत नाहीत. त्यामुळे याआधी एक-दोन मिनिटांत भरल्या जाणाऱया बिलासाठी बराच वेळ लागत असल्याने वीज बिल भरणा केंद्राबाहेर भल्यामोठय़ा रांगा लागत आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

z वीज बिल भरणा केंद्रावर पूर्वीप्रमाणे एकतरी कर्मचाऱयासह काऊंटर सुरू ठेवावा. त्यामुळे ज्या ग्राहकांना स्वयंचलित मशीन हाताळता येत नाही, त्यांची गैरसोय होणार नाही अशी मागणी ग्राहक करत आहेत.

अदानी इलेक्ट्रिसिटीची पूर्व आणि पश्चिम उपनगरात सुमारे 42 प्रमुख वीज बिल भरणा केंद्रे आहेत. आतापर्यंत या वीज बिल भरणा केंद्रावर बिलाच्या रकमेचा भरणा करून घेण्यासाठी कर्मचारी कार्यरत होते. त्यामुळे वीज ग्राहकाचे वीज बिल तातडीने भरले जात होते. मात्र गेल्या पाच-सहा महिन्यांपासून अदानी इलेक्ट्रिसिटीने वीज बिल भरणा करण्याचे काऊंटर बंद करून त्या जागी प्रत्येकी दोन स्वयंचलित मशीन (कियॉस्क) लावल्या आहेत. या मशीनच्या माध्यमातून ग्राहकांना स्वतःच वीज बिल भरता येते. तसेच सदरची मशीन बिलाचे पैसे भरून झाल्यानंतर तत्काळ त्याची पोच पावतीही देत आहे. मात्र अनेक ग्राहकांना या मशीन हाताळता येत नाहीत. अनेकदा चुकीचा पर्याय निवडल्यास बिल भरण्याची संपूर्ण प्रक्रिया दुबार करावी लागते. तसेच मशीनमध्ये एकएक करून चलनी नोट टाकावी लागत असल्याने संपूर्ण बिल भरण्यासाठी बराच वेळ जातो. दरम्यान सदरच्या बिल भरणा केंद्रात एक मदतनीस कार्यरत असून त्याच्याकडून ग्राहकांना मदत होत असली तरीही संपूर्ण प्रक्रिया ही वेळखाऊ आहे. याबाबत अदानी इलेक्ट्रिसिटीकडे विचारणा केली असता या कियॉस्कमुळे स्वतःचे बिल भरण्याबरोबर ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी ऑनलाइन, नेट बँकिंग, यूपीआय ऍप असे विविध पर्याय उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.

मशीन सुट्टे पैसे स्वीकारत नाही

वीज बिल भरण्यासाठी येणारे ग्राहक अनेकदा शंभर रुपयांवरील रक्कम दहा-वीस रुपयांच्या कॉईनच्या स्वरूपात घेऊन येतात. मात्र सदरची मशीन कॉईन स्वीकारत नसल्याने ग्राहकांना दहा-वीस रुपयांच्या नोटांसाठी धावपळ करावी लागत आहे.