मिंधे–भाजप सरकार डरपोक, राज्यातील 87 टक्के जनतेचे मत, आदित्य ठाकरे यांचा ट्विटर सर्व्हे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी सिनेट निवडणुकीच्या स्थगितीनंतर राज्यातील जनतेलाच मिंधे सरकारबद्दल प्रश्न विचारला होता. हे सरकार सिनेट निवडणुका होऊ देईल का? अशा त्यांच्या प्रश्नाला 87 टक्के जनतेने नकारार्थी उत्तर दिले असून मिंधे सरकार डरपोक आहे यावरही शिक्कामोर्तब केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका मिंधे सरकारने अचानक स्थगित केल्या. त्यावरून युवा सेनेबरोबरच सर्व विद्यार्थी संघटनांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आदित्य ठाकरे यांनीही या निर्णयावरून मिंधे सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी ट्विटर या सोशल नेटवार्ंकग साईटवर राज्यातील जनतेला दोन प्रश्न विचारून जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
मिंधे-भाजपा सरकार मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका 10 सप्टेंबरला होऊ देईल का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करून त्या प्रश्नाला ’हो’ किंवा ’नाही, सरकार घाबरट आहे’ अशी दोन पर्यायी उत्तरे दिली होती. 13 टक्के लोकांनी ’हो’ हे उत्तर निवडले आहे तर त्यापेक्षा सहा पटीने जास्त लोकांनी ’नाही, सरकार घाबरट आहे’ या उत्तराला पसंती दिली आहे.