तालिबानच्या होकारावर अफगाणी महिलांच्या शिक्षणाचे अधांतरी भवितव्य..

महिला शिक्षणावर बंदी असलेला अफगाणिस्तान हा जगातील एकमेव देश आहे. तालिबानने गेल्या डिसेंबरमध्ये महिलांना महाविद्यालयात जाण्यावर बंदी घातली.  त्यामुळे संपूर्ण जगात  संतापाची लाट उसळली. ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर लगेचच सहाव्या इयत्तेच्या पुढे मुलींना शाळेत जाण्यास बंदी घालण्यात आली. पण आता

अफगाणिस्तानची विद्यापीठे महिलांना पुन्हा प्रवेश देण्यास तयार आहेत, पण अजूनही यात तालिबानचा अडसर आहेच.अफगाणिस्तानचे उच्च शिक्षण मंत्री, निदा मोहम्मद नदीम यांनी त्या वेळी सांगितले की मुलामुलींचे एकत्र शिक्षण आमच्याकडे होऊच शकत नाही. यासाठी महिलांना  विद्यापीठामध्ये  बंदी घालणे आवश्यक आहे, शिवाय  काही विषय  इस्लामच्या तत्त्वांचे उल्लंघन करतात त्यामुळे अभ्यासक्रमात असूच नये.  ते म्हणाले की, तालिबानचा नेता हिबतुल्ला अखुंदजादा याने दक्षिणेकडील कंदाहार शहरातून जारी केलेली बंदी पुढील सूचना मिळेपर्यंत लागू होती. अखुंदजादा यांनी बंदी उठवण्याचा आदेश दिल्यानंतर विद्यापीठे महिलांना  पुन्हा प्रवेश देण्यास तयार आहेत. पण त्यांचा आदेश येण्याची वाट पहावी लागेल. त्यांनी पुढे सांगितले की आमच्या शिक्षण संस्था सगळ्या समस्यांवर तोडगे काढून स्त्री शिक्षणासाठी तयार आहोत. मुलामुलींसाठी वेगवेगळ्या वेळा, गणवेश, वेगळे अभ्यासक्रम साऱ्यांवर उपाय काढले गेले आहेत. वाहतुकीची समस्या सोडविल्या गेल्या की बहुतेक परवानगी मिळेल. आणि महिलांसाठी विद्यापीठे पुन्हा उघडली जातील.