भटकंती – पृथ्वीवरचा स्वर्ग न्यूझीलंड

>> निमिष पाटगावकर

 न्यूझीलंड त्याच्या भौगोलिक स्थानामुळे अजूनही बहुतेकांच्या पर्यटनाच्या यादीत युरोप, अमेरिका वगैरे झाल्यावर येते. यामुळे इथे लंडन, न्यूयॉर्कसारख्या प्रवाशांच्या झुंडी दिसत नाहीत आणि म्हणूनच इथले सौंदर्य अबाधित राहिले आहे. इथे पोहोचायला वेळ आणि पैसे दोन्ही जास्त लागतात, पण न्यूझीलंडला पृथ्वीवरचा स्वर्ग का म्हणतात हे समजायला एकदा तरी इथे जायलाच हवे.

आजवर जगात केलेल्या भटकंतीत मला कुणी विचारले की, पृथ्वीवरचा स्वर्ग कुठे आहे तर मी प्रामुख्याने तीन देशांची नावे घेईन. एक अर्थातच स्वित्झर्लंड, दुसरे स्कॉटलंड आणि तिसरा देश म्हणजे न्यूझीलंड! यात स्वित्झर्लंडला अनेक हिंदुस्थानी पर्यटकांचे पाय लागलेले असतात. ज्यांना या पृथ्वीवरच्या स्वर्गात जायला जमले नाही त्यांच्यासाठी यश चोप्रांनी आपल्या अनेक चित्रपटांतून हा स्वर्ग दाखवला आहे. न्यूझीलंडला जाण्यासाठी वाट मात्र बरीच वाकडी करून जावे लागते आणि त्यामुळे हे खर्चिक कामही आहे. या न्यूझीलंडला मला कामाच्या निमित्ताने अनेक वेळा जाता आले आणि प्रत्येक वेळी न्यूझीलंडचे एक अनोखे लोभसवाणे दर्शन झाले. प्रथमदर्शी प्रेमावर दुसऱ्यांदा दर्शन हा उपाय सांगतात, पण न्यूझीलंडने मात्र तो खोटा ठरवला. न्यूझीलंडच्या प्रत्येक दर्शनात हे प्रेम वाढतच गेले.

उत्तर आणि दक्षिण अशा दोन खंडांत विभागलेल्या या देशात मात्र एकसंधता आहे ती त्या देशाच्या अगत्याने, अत्यंत सभ्य अशा लोकांच्या अगत्याने आणि दोन्ही खंडांतील एकसंध अशा निसर्गाच्या आविष्काराने. जगातील सज्जन माणसांचा देश असे न्यूझीलंडचे वर्णन केले तरी ती अतिशयोक्ती वाटणार नाही. एकच काय वाईट असेल ते म्हणजे तिथे पोहोचायला लागणारा वेळ. एकदा का ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेचे टोक गाठले आणि टास्मन समुद्र ओलांडला की, न्यूझीलंडची भूमी खुणावू लागते. न्यूझीलंड जरी चिमुकला देश असला तरी इथल्या प्रत्येक शहराचे वेगळेपण आहे. नॉर्थ आयलँडमधली ऑकलंड, हॅमिल्टन आणि राजधानी वेलिंग्टन, तर साऊथ आयलँडमधली ख्राईस्टचर्च, डनेडीनही पाच प्रमुख शहरे असली तरी यात प्रत्येकाची खासियत आहे. एकंदरीतच न्यूझीलंड हा युरोपच्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि अमेरिकेच्या मानवनिर्मित शहरांचा सुंदर मिलाफ आहे.

मी जेव्हा पहिल्यांदा ऑकलंडला गेलो तेव्हा तिथल्या उंच इमारती बघून अमेरिकेतल्या कुठच्याही मोठय़ा शहराच्या डाऊनटाऊनची आठवण झाली, पण हे नुसतेच शहराच्या स्कायलाईनचे साम्य होते. पण ऑकलंडमध्ये अगदी मध्यरात्रीही तुम्ही निर्धास्तपणे फिरू शकता. या डाऊनटाऊनच्या अमेरिकन संस्कृतीतून बाहेर पडायला ऑकलंड बंदरातून बोट पकडून रंगीटोटो, वाहिकीसारखी सुंदर बेटे आहेत. एकदा तिकडे पोहोचल्यावर शहरी संस्कृतीपासून दूर निव्वळ निसर्गाच्या कुशीत शिरायचे असते. ऑकलंडवासी एकदा उन्हाळा चालू झाला की, विकेंडला या बेटांवर जायला आतुर असतात. माओरी जमात ही एकेकाळी भूगोलात चार ओळींची माहिती वाचली होती, पण इथे आल्यावर इथल्या या मूळ लोकांना म्हणजेच माओरी लोकांना यथोचित मान दिला जात असल्याचे दिसते. सगळय़ा पाटय़ा इंग्लिश आणि माओरी दोन्ही भाषेत असतात. ही माओरी नावे जरा विचित्र असल्याने सुरुवातीचा काही काळ या नावांशी जमवून घेण्यात जातो.

ऑकलंडपासून साधारण दोन तासांवर रोटोरुआ म्हणून गाव आहे. तिथे गेल्यावर आपण एकविसाव्या शतकात आहोत हे विसरायला होते. कारण इथे माओरी लोकांचे एक अख्खे राहते गाव आहे. माओरी लोकांत हान्गी आणि होंगी या दोहोंना मोठे महत्त्व आहे. हान्गी म्हणजे त्यांची गरम दगड जमिनीच्या आत असलेल्या चुलीत ठेऊन शिजवायची पद्धत. इथे गरम पाण्याच्या कुंडातही कणसे आणि इतर पदार्थ टाकून शिजवतात. या रोटोरुआला या हान्गी जेवणाची चव बघता येते. एक अनुभव म्हणून एकदा चव बघणे ठीक आहे, पण मसाल्याच्या चवीला चटकलेल्या माझ्या जिभेला ते फारसे मानवले नाही. हान्गी हे खाणे झाले तर होंगी हा त्यांचा पारंपरिक अभिवादन करायचा प्रकार. हा होंगी डान्स त्यांच्या चित्रविचित्र आदिवासी पोशाखात आणि मुद्रा अभिनयात असा करतात की, खरे सांगायचे तर भीती वाटते. पाहुण्यांचे स्वागत करतानाच हे पाहून पाहून पळून जाईल, पण तुम्ही जेव्हा या माओरी लोकांशी बोलता तेव्हा लक्षात येते ते म्हणजे ही अगदी साधी लोक आहेत.

ऑकलंड ही न्यूझीलंडची मुंबई आहे, तर वेलिंग्टन हे दिल्ली आहे. वेलिंग्टनला वाऱ्याचे शहर म्हणतात. कारण समुद्राकाठचा हा उनाड वारा सैरावैरा मिळेल तिथून वाहत असतो. वेलिंग्टनच्या कुठच्याही भागात हा वारा पोहोचला नाही असे होणार नाही. वाऱ्याचा एक आवाज सतत आपल्या कानात घुमत असतो. हे वेलिंग्टन या नॉर्थ आयलंडचे खालच्या टोकाचे शहर. इथून एखाद्या प्रेमी युगुलाची ताटातूट व्हावी तसे समुद्र न्यूझीलंडचे दोन भाग करतो. जसे तुम्ही साऊथ आयलंडला जाता तेव्हा निसर्गाचा एक वेगळाच चमत्कार दिसतो. क्वीन्सटाऊन हे एक असेच सुंदर शहर. लेक वाकाटिपूच्या काठावर बसलेले. या शहरातून नुसते फिरताना समोर सुंदर लेक, आकाशात विशेषत सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला होणारी रंगांची उधळण आणि त्यांचे पाण्यातील प्रतिबिंब असे तासन्तास बघत राहावे असे दृश्य असते. इथूनच पुढे मिलफर्ड साऊंड नावाची जागा आहे. समुद्रातून बोटीतून फिरताना अनेक विस्तीर्ण खडकांमधून वाट काढत बोट जाताना काठावर पेंग्विन, वॉलरस, सील यांचे अनोखे विश्व दिसते.

[email protected]