अभिव्यक्ती – कामवाली आणि घरवाली

>> डॉ. मुकुंद कुळे

आपल्या माणूसपणाच्या जाणिवा-संवेदना अधिक व्यापक करणाऱया कलाकृती घडत असतात, सादर होत असतात. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचून आपल्यातील या जाणिवा ओळखण्याचा प्रवास माणूस म्हणून समृद्ध करणारा असतो. अशाच समृद्ध करणाऱया दोन कलाकृतींचं व्यक्त होणं मांडणारा हा लेख.

चांगली कामवाली बाई मिळणं म्हणजे नोकरदार महिलेसाठी खरोखर लॉटरी लागण्यासारखंच असतं! पण चांगली कामवाली बाई म्हणजे नेमकं काय?

…तर तिने छान झाडू काढला पाहिजे, छान लादी पुसली पाहिजे, छान कपडे धुतले पाहिजेत, छान भांडी घासली पाहिजेत, छान स्वयंपाक केला पाहिजे, घरात मूल असेल तर ते छान सांभाळलं पाहिजे आणि एवढंच नाही तर घर नीटनेटकं ठेवून ते छान सांभाळलंही पाहिजे. म्हणजे कामवाली बाई ही कामवाली कमी आणि घरवालीच जास्त असते. कधी कधी ही सारी कामं बारा तासांसाठी ठेवलेली एकच बाई करते, तर कधी कधी या कामांसाठी वेगवेगळ्या बाया असतात. पण कामवाली बाई एक असो किंवा अनेक, तिने आपलं घर समजून सगळं काम केलं पाहिजे अशीच प्रत्येक घरातल्या खऱया घरवालीची म्हणजे नोकरदार महिलेची मनोमन इच्छा असते. पण मग कामवाल्या बाईच्या इच्छेचं काय! तिला समजून-उमजून घेणारी चांगली मालकीण म्हणजेच नोकरदार महिला मिळते का कधी?

खरं तर कामवाली बाई आणि नोकरदार बाई म्हणजे एकमेकींचा आरसाच. दोघीही आपापल्या संसाराला हातभार लावण्यासाठी कामाच्या ठिकाणी राबणाऱ्या. त्यासाठी आधी घरातलं आटपून मग कामाच्या ठिकाणी धावणाऱ्या. दोघींच्या सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक स्थानांची बरोबरी होऊ शकणार नाही कदाचित, परंतु बाई म्हणून दोघींची यत्ता मात्र एकसारखीच असते अन् तरीही कामवाली बाई आणि नोकरदार बाई यांच्यातला तिढा म्हणजे जणू आजवर कुणालाच न सुटलेलं कोडं!

हे कोडंच थोडंफार सोडवण्याचा प्रयत्न एकप्रकारे `नाच गं घुमा’ या सिनेमात केलेला दिसतो खरा, परंतु आपण पांढरपेशी आणि मध्यमवर्गीय जाणिवा-संवेदनांमध्ये एवढे अडकून पडलेलो असतो की, आपण त्याच त्याच आवर्तात फिरत बसतो. कामवाली बाई म्हणजे ती झोपडपट्टीतच राहात असणार, तिचा नवरा तिला मारतच असणार आणि या साऱ्या प्राक्तनामुळे तिची संसारात होणारी ओढाताण नि परिणामी कामाच्या ठिकाणी तिला होणारा उशीर, मग नोकरदार महिलेची चिडचिड. कामवाली आणि खरी घरवाली या दोघींच्या नात्याच्या अवकाशात आपल्याला अद्याप या पल्याडचं काहीच सापडू नये ही खरं तर आपल्या कल्पनाशक्तीची शोकांतिकाच म्हणायला हवी!

खरं तर तसे प्रयत्न अगदीच होत नाहीत असं नाही, परंतु कदाचित तसे प्रयत्न करणाऱयांचा पदर तोकडा पडतो. राज्यात-देशात-परदेशात सगळ्याजणी कशा `घुमा नाचली, घुमा नाचली’ म्हणत घुमायला लागल्या. परंतु रसिका आगाशे निर्मित `तिचं शहर होताना’ प्रदर्शित झाला तेव्हा असं कुणी घुमलं नाही. `नाच गं घुमा’ आणि `तिचं शहर होताना’ हे दोन्ही सिनेमे काहीसे एकाच विषयावरचे आहेत. दोन्ही सिनेमांत कामवाली बाई आणि नोकरदार महिला यांच्यातलेच ताणेबाणे दाखवण्यात आलेत. परंतु `नाच गं घुमा’ टिपिकल मध्यमवर्गीय जाणिवा-संवेदना अधोरेखित करतो, त्याही वरवरच्या, तर `तिचं शहर होताना’मध्ये कामवाली बाई आणि नोकरदार महिला या दोघींचं नातं अधिक सशक्तपणे पुढे जातं. अगदी सामाजिक-सांस्कृतिक भेद मिटवण्यापर्यंत. इथे `नाच गं घुमा’ आणि `तिचं शहर होताना’ या सिनेमांची तुलना करण्याचा हेतू नाही, परंतु कला माध्यमाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातला फरक अधोरेखित करण्याचा नक्कीच आहे.

आपल्या बहुतेकांच्या घरी या कामवाल्या महिला येत असतात. पण एक कामवाली या पलीकडे आपल्याला तिची फारशी ओळख नसते. खरंच कुठून येतात या कामवाल्या बाया आणि त्या कुठे जातात? कुठे राहतात आणि कशा जगतात? आपल्याला काहीच ठाऊक नसतं. आपण अनभिज्ञ असतो त्यांच्या जगापासून. आता आतापर्यंत तरी आपल्याला काही म्हणजे काहीच ठाऊक नसायचं. अलीकडे मात्र प्रत्येकीला आपलं ओळखपत्र जवळ ठेवणं सक्तीचं झाल्यामुळे त्या कुठल्या एरियात किंवा झोपडपट्टीत राहतात, ते आपल्याला साधारणपणे ठाऊक असतं. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या जगण्याची गंधवार्ताही आपल्याला नसते. आपण कामवाल्या महिलेला तिच्या श्रमाचे-सेवेचे चोख पैसे देत असतो. अर्थात असे पैसे तर आपल्यालाही आपल्या सेवेचे कंपनीकडून मिळत असतात. वर दुखल्या-खुपल्याला भरपगारी रजाही मिळते.

मात्र कामवाली महिला एक दिवस जरी आली नाही तरी लगेच तिचा उद्धार होतो… “या बाया अशाच असतात, गरज असते तेव्हा नेमक्या दांडय़ा मारतात,” किंवा “आजकाल हिच्या दांडय़ा खूप वाढल्यात, एकदा समज द्यायलाच हवी” वगैरे. प्रत्यक्षात तिने काही हौसेने घरकामाला दांडी मारलेली असते असं नाही. तिचा नाईलाज होतो तेव्हाच ती दांडी मारते. पण आपल्या लक्षातच येत नाही की, कधीतरी कामवाल्या महिलेचीही अडचण असू शकते; कधीतरी तिलाही आपल्यासारखा कामाचा कंटाळा येऊ शकतो. (म्हणून घरकामाला दांडी मारणाऱया बाया क्वचितच सापडतील) पण आपल्यालाच या कामवाल्या महिलांची, त्यांच्यावर घरातलं सगळं काम टाकण्याची इतकी सवय झालेली असते की, एखाद्या दिवशी कामवाली महिला आली नाही की, अख्खं घर ठप्प होऊन जातं. जर तिची सात-आठ किंवा पंधरा दिवस दांडी असेल तर मग लगेच नवी कामवाली शोधली जाते.

…आणि ही नवी कामवाली `तिचं शहर होणं’मधल्या किरण पवारसारखी असेल तर ती घरमालकिणीला लगेच शालजोडीतला हाणेल…“बाई हवी, बाई हवी काय लावलंय? तुम्ही पण बाईच आहात की!”

म्हणजे स्त्राr ऑफिसात काम करणारी असो किंवा घरकाम करणारी, एका परीने ती बाईच असते. घरीदारी राबणारी… आणि जेव्हा एका स्त्राrला दुसऱया स्त्राrचं जगणं उमजतं-समजतं, तेव्हा मग खऱया अर्थाने तिच्या जाणिवेच्या-संवेदनेच्या कक्षा रुंदावत जातात. अगदी `तिचं शहर होणं’मधल्या अर्चनासारख्या. अर्चना हायफाय सोसायटीत राहणारी, आयटी कंपनीत नोकरी करणारी, पण एकदा रस्त्यावर घरकाम करणाऱया किरणशी ती बोलत असतानाच एक ट्रक किरणला उडवून निघून जातो. आपल्यामुळेच किरणचा मृत्यू झाला या अपराधी भावनेतून अर्चना, किरण राहत असलेल्या झोपडपट्टीत जाते आणि एक वेगळंच बकाल जग पाहते. आजवर सुरक्षित कोषात वाढलेली-वावरलेली अर्चना या झोपडपट्टीचा तिरस्कारच करत असते. गाडीतून जाता-येताना दिसणाऱया झोपडपट्टीचं अंतरंग तिला कुठे ठाऊक असतं? आजवर तिला फक्त एवढंच माहीत असतं की, अस्ताव्यस्त पसरलेल्या झोपडपट्टय़ा म्हणजे आखीव रेखीवपणे वसलेल्या शहरावर पडलेला डागच जणू! पण एक कार्यकर्ती तिला सुनावते, “या झोपडपट्टय़ांच्या भरवशावरच तर तुमचं शहर चालतं. तुमच्या घरात अडल्या-नडल्याला काम करायला येणारी माणसं कुठून येतात? या झोपडपट्टय़ांतूनच तर येतात. शहरांच्या बाजूला गटार-नाल्यांच्या आधाराने कुचंबलेलं जगणं कुणाला हवं असतं? पण नाईलाज असतो… झोपडपट्टय़ांत राहणारी ही माणसंच तर आपल्या घरी-ऑफिसात मदतनीस म्हणून कामाला असतात हे अर्चनाला उमगतं अन् मग तिला झोपडपट्टीच नव्हे, तर शहर आकळायला सुरुवात होते… आणि कितीही विद्रूप असला तरी झोपडपट्टी हादेखील शहराचाच एक चेहरा आहे हे तिला उमजतं…

आपण स्वीकारायला तयार आहोत का झोपडपट्टीला? हिंदुस्थानसारख्या देशात, जिथे सगळ्याच संपत्तीचं असमान वाटप आहे, तिथे या झोपडपट्टय़ांना स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपलं घर राखण्यासाठी तरी त्या आपल्याला स्वीकाराव्या लागतील. कारण आपल्याला हरेक प्रकारच्या घरकामासाठी लागणारी माणसं बहुतांशी तिथूनच तर येतात. म्हणूनच बारीकसारीक कारणांवरून त्यांच्यावर डाफरण्याआधी किंवा त्यांना नाव ठेवण्याआधी कधी तरी त्यांच्या अंतरंगात डोकवा, जमलंच तर ते राहत असलेल्या झोपडपट्टय़ांमध्ये फेरफटका मारा… म्हणजे `आपण’ आणि `ते’ यांच्या जगण्यातली विसंगती कळून येईल. कदाचित `मी’पणाच गळून जाईल. मग `कामवाली’ आणि `नोकरदार’ असा भेद न उरता उरेल ती फक्त आस्था-आपुलकी. माणसाला माणसाबद्दल असलेली!

`नाच गं घुमा’ फक्त तेवढय़ापुरतं मनोरंजन करतो, `तिचं शहर होणं’ मात्र आपल्या माणूसपणाच्या जाणिवा-संवेदना अधिक व्यापक करतो!

[email protected]