गुंतवणुकीचे सोपे तंत्र एसआयपी

>> राजन पाठक, आर्थिक सल्लागार

अनेकदा एसआयपी हा शब्द कानावर पडतो. एसआयपी किंवा पद्धतशीर गुंतवणूक योजना तुम्हाला तुमच्या पसंतीच्या म्युच्युअल फंड योजनेत दरमहा निश्चित रक्कम गुंतवण्याची संधी देते.

एके दिवशी माझ्या ड्रायव्हरने म्हणजे प्रवीणने मला विचारलं की, एसआयपी सुरू करू शकतो का? त्याच्या प्रश्नाने मी चकित झालो. मी प्रवीणला विचारलं की, तुला एसआयपीचं कसं समजलं? त्यावर प्रवीण म्हणाला, मला माझ्या एका ड्रायव्हर मित्राने म्हणजे दीपकने सांगितले.  दीपक त्याची एसआयपीमधील सर्व गुंतवणूक मोबाईलवर पाहतो. दीपकने मला मोबाईलवर त्याची जमा रक्कम दाखवली. तो गेल्या पाच वर्षांपासून एसआयपी करत आहे. तो प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये जमा करतो.

प्रवीण एसआयपीबद्दल खूपच भारावून सांगत होता. ‘आपल्या बचतीचा ट्रक रेकॉर्ड मोबाईलवर दिसतो. गरजेनुसार पैसे काढू शकतो, वा जमा करू शकतो. त्यासाठी कुठल्याही ठिकाणी जायची गरज नाही. आपली डय़ुटी सांभाळून या गोष्टी करता येतात… वगैरे. ’

ड्रायव्हरची कहाणी ऐकून मी फारच प्रभावित झालो. एका ड्रायव्हरने दुसऱया ड्रायव्हरला एकदम सोप्या पद्धतीने एसआयपी समजावून सांगितली होती. मला दीपकला भेटायची इच्छा झाली. त्याला भेटल्यानंतर तर मी आणखी चकीत झालो. कारण दीपकने आणखी 15 ते 17 ड्रायव्हर्सना एसआयपीबद्दल माहिती दिली होती. आता ते सगळे आपल्या ऐपतीनुसार एसआयपी करत आहेत.

 पार्ंकगच्या ठिकाणी सगळे मित्र जमायचे तेव्हा मोबाईल अॅपच्या माध्यमातून एसआयपीबद्दल एकमेकांना माहिती शेअर करायचे. खरंच, मला हे खूप काwतुकास्पद वाटलं. मी दीपकच्या कार्याची प्रशंसा केली. तू खूप चांगलं सामाजिक कार्य करतो आहेस, असे मी त्याला सांगितले. त्यावर दीपकचं उत्तर आणखीनच सुंदर होतं. तो म्हणाला, सामाजिक कार्य वगैरे मला माहीत नाही, पण जसा मला फायदा होतोय तसा दुसऱयांनाही व्हायला पाहिजे. हा विचार करून मी एसआयपीबद्दल मित्रांना सांगतो.

म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये मध्यमवर्गीयदेखील पैसा गुंतवू लागले आहेत. यामागे एसआयपीची सुलभता हे कारण आहेच, पण डिजिटल इंडिया अभियानही कारणीभूत आहे. घराघरांत स्मार्टपह्न, इंटरनेट सर्व्हिस पोचल्यामुळे एसआयपीची प्रक्रिया एका क्लिकवर पार पडताना दिसत आहे. बचतीबाबत लोक सजग होत आहेत, हे चित्र सकारात्मक आहे.