विज्ञान-रंजन – झॅपेलिनची झेप आणि…

>> विनायक

आकाशात तरंगणाऱया महाकाय देवमाशासारखं दिसणारं ‘झॅपेलिन’ हे विशाल ‘बलूनयान’ जगभरच्या लोकांचं लक्ष वेधून घेत असे. आधुनिक महाकाय जम्बो-जेट विमानांचं युग सुरू होण्यापूर्वी झॅपेलिन विमानांनी पहिल्या ‘पावर्ड-फ्लाइट’ने आधुनिक प्रवासी-विमानयुगाचा व्यापक प्रमाणावर आरंभ झाला. त्यापूर्वी गॅस भरलेल्या बलूनला ‘बास्केट’ बांधून आकाशात विहरण्याचे प्रयत्न झाले होते. मुंबईत, शिवकर बापूजी तळपदे यांनी 1895 मध्ये चौपाटीवर उडवलेल्या ‘मरुत्सखा’ यानाच्या उड्डाणाच्या वेळी नामवंत व्यक्ती हजर होत्या.

इंजिन बसवलेल्या विमानांच्या परंपरेत झॅपेलिन या पावर्ड-बलूनसारख्या यानांनी 1910 ते 1937 या काळात आकाश कवेत घेण्याचा प्रयत्न केला होता. जर्मनीच्या सैन्यदलातील फर्निनान्ड व्हॉन झॅपेलिन यांनी थिओडर कांबर यांच्यासह ‘झॅपेलिन’ यानाचा आराखडा बनवला. हायड्रोजनसारखा ज्वालाग्रही परंतु हलका आणि विपुल प्रमाणावर उपलब्ध वायू भरलेले अनेक बलून पिंवा सिलिंडर बसवून आकाशात कमी उंचीवरून उडणारी विशाल झॅपेलिन तयार होऊ लागली. अॅल्युमिनियम आणि तांब्याच्या पट्टय़ांनी बनवलेल्या या यानाच्या सांगाडय़ावर रबर-कॉटनचं चिवट आवरण असायचं. आमच्या लहानपणी याच कापडाला बहुदा ‘मेणकापड’ असा शब्द होता. झॅपेलिनच्या उड्डाणाचं संचालन जमिनीवरच्या ‘मूर मास्ट’सारख्या टॉवरमधून व्हायचं.
या यानांनी सुमारे 27 वर्षांत 1500 उड्डाणं करून 10 हजार लोकांना हवाई प्रवास घडवणाऱया झॅपेलिनचं काwतुक जगात होऊ लागलं. अनेक शक्तिशाली इंजिनं बसवलेलं झॅपेलिन ताशी सुमारे 100 किलोमीटर वेगाने उडायचं. 1916 मधल्या आर-क्लास झॅपेलिनची लांबी 199 मीटर पिंवा 654 फूट होती. ‘मेबॅच’ प्रकारच्या इंजिनांवर चालणारं हे झॅपेलिन जर्मनी युद्धासाठी वापरायची. अशाच लढाऊ यानातून त्यानी फ्रान्स आणि इंग्लंडवर, पहिल्या महायुद्धात (1914 ते 19) बॉम्बिंग केलं होतं. 23 सप्टेंबर 1916 रोजी इंग्लंडने, जर्मनीचं लढाऊ झॅपेलिन प्रतिहल्ला करून जमीनदोस्त केलं होतं.

नंतर आलेली प्रवासी झॅपेलिन मात्र प्रशस्त आणि वैभवशाली (पॉश) असायची. प्रवाशांना राहण्यासाठी सुसज्ज खोल्या. जेवणासाठी उत्तम डायनिंग हॉल, बाहेरचं दृश्य पाहता यावं म्हणून पारदर्शक खिडक्या आणि या अक्षरशः ‘वायुमान’ असलेल्या विमानाला आग लागू नये याची आटोकाट काळजी घेऊन तयार केली स्मोकिंग-रूम किंवा धूम्रपानाची जागा. अशा सर्व सुखसोयींसह झॅपेलिन प्रवासासाठी सुमारे 400 डॉलरचं तिकीट असायचं. साहजिकच हा श्रीमंती प्रवास होता. तरीही त्याला भरभरून प्रतिसाद लाभला.

जर्मनी ते उत्तर अमेरिका, ब्राझील अशा अनेक युरोप-अमेरिकन देशात, अॅटलँटिक महासागर ओलांडून झॅपेलिन यानं प्रवास करत असत. जर्मन फिल्ड मार्शल पॉल हिंडेन्बर्ग यांच्या नावे उडणाऱया झॅपेलिननी अॅटलँटिक महासागर 17 वेळा पार केला होता. ‘ग्राफ’ प्रकारच्या महाकाय प्रवासी झॅपेलिनची 590 उड्डाणं झाली होती. या यानाने एकूण 17 हजार तास उड्डाण करून 1 लाख 70 हजार किलोमीटर अंतर कापलं होतं. 36 हवाई सेवक (क्रू) आणि 24 प्रवाशांसह या यानाने पॅसिफिक महासागरही एकाच झेपेत ओलांडला! ते ब्लू गॅसच्या इंधनावर उडत असे (ज्याची ज्योत निळी असते असा ज्वालाग्रही वायू.)

झॅपेलिनच्या इतिहासातील सर्व उड्डाणांमध्ये अपघात खूपच कमी झाले. 5 ऑगस्ट 1908 रोजी एक झॅपेलिन स्टुटगार्ट येथे कोसळलं, पण त्यात जीवितहानी झाली नव्हती. झॅपेलिन हे सुरक्षित आणि वेगवान हवाई प्रवासाचं साधन म्हणून विकसित तसंच लोकप्रियसुद्धा होऊ लागलं. या यानाने पाव शतक आकाश-संचार केला. त्याचे पह्टो घेतले गेले.

…आणि 6 मार्च 1937 हा दिवस उजाडला. अमेरिकेत न्यू जर्सी येथे उतरणाऱया झॅपेलिनचं ‘दर्शन’ घ्यायला मोठी गर्दी झाली होती. ‘ब्रिटिश पॅथे’ या फिल्म कंपनीचे विल्यम डी. या यानोड्डाणाचे चित्रण करत होते. संथ गतीने, डॉपिंग टॉवर (मूरिंग) सांगेल तशी सूचना पाळत LZ पद्धतीचं हिंडेन्बर्ग झॅपेलिन वेग कमी करत खाली येऊ लागलं. बस्स…काही मिनिटांचाच अवकाश की झॅपेलिनचं लॅण्डिंग कॅमेराबद्ध होणार होते. ही एक डॉक्युमेन्टरी (माहितीपट) होती.

मात्र पाहता पाहता, क्षणार्धात विपरीत घडलं. यानाच्या मागच्या बाजूने (टेल पार्ट) अचानक धूर येऊ लागला. प्रेक्षकांच्या मनात भीतीची लहर उमटली. तोच पुढच्या भागानेही पेट घेतला आणि अवघ्या अर्ध्या मिनिटात ते भव्य झॅपेलिन भस्मसात झालं! त्यामधून प्रवास करणाऱया 97 जणांपैकी 35 जणांना प्राण गमावावे लागले. बाकीचे जखमी झाले. या भीषण घटनेनंतर हवाई प्रवासाची अनुभूती देणारा हा व्यवसाय सामान्य प्रवाशांसाठी बंद करण्यात आला. आता अधिक भक्कम आणि वेगवान प्रवासी विमानांचं युग सुरू होणार होतं. ‘सुपरसॉनिक’ विमान हा त्यातला उच्चांक ठरणार होता.