मराठमोळी शास्त्रज्ञ डॉ. रंजिता शेगोकार

वर्षा चोपडे  << [email protected] >>

अत्यंत खडतर परिस्थितीत संघर्ष करीत कॅन्सरवरील औषध संशोधनक्षेत्रात अलौकिक यश मिळवणार्या मराठमोळ्या शास्त्रज्ञ डॉ. रंजिता शेगोकार. इतर अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांसोबतच नुकताच डॉ. रंजिता यांना प्रतिष्ठित असा जर्मन इनोव्हेशन अवॉर्ड 2022 प्राप्त झाला आहे. महाराष्ट्राला भूषण वाटेल असे डॉ. रंजिता यांचे कर्तृत्व आहे.

पक्ष्याला उंच भरारी घ्यायची असेल तर त्याच्या पंखात बळ असावे लागते, परंतु मनुष्यप्राण्याची गोष्ट काही वेगळीच आहे. देवाने मानवास पंख दिले नसले तरी मनगटात बळ दिले आहे आणि जर चिकाटी व ध्येय, वेडेपण असले तर गरिबीची सीमारेखा त्यापुढे हरते हे सत्य आहे. स्त्राr शक्तिरूपा असली तरी तिला घरातील अनेक जबाबदाऱया पार पाडाव्या लागतात. डॉ. रंजिता यांचा खडतर संघर्ष समस्त स्त्रियांसाठी एक बळ देणारा आहे. अनेक निराश, खचलेल्या विद्यार्थ्यांना नवीन दिशा देणारा आहे.

डॉ. रंजिता शेगोकार यांचा संघर्ष जगावेगळा आहे. कारण घरची बेताची परिस्थिती आणि कुणाचेही मार्गदर्शन नसताना त्यांनी संभाजीनगर शहरात बी. फार्म पूर्ण केले. त्यानंतर एम. फार्मसाठी एसएनडीटी  कॉलेज, मुंबईला प्रवेश घेतला. मग मात्र मार्गदर्शन मिळत गेले. स्वतचा मार्ग स्वत शोधत गेल्या आणि त्या यशाच्या पायऱया चढत गेल्या. हॉस्टेलमध्ये राहणे आणि हलाखीच्या परिस्थितीत जगणे कठीण होते, पण अनुभव आणि परिस्थितीने खूप काही शिकवले. मान, अपमानाची त्यांनी कधीच पर्वा केली नाही आणि पुढे डॉ. रंजिता यांनी एसएनडीटी   विद्यापीठातूनच फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजीमध्ये पीएच.डी. मिळवली आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाने तिचे टॅलेंट ओळखले व तिला जर्मनीला हाय रिसर्चसाठी बोलावले. रंजना यांनी जर्मनीला जाण्याची संधी स्वीकारली. त्यांनी बर्लिन, जर्मनीच्या फ्री युनिव्हर्सिटीमध्ये फार्मास्युटिक्स, बायोफार्मास्युटिक्स आणि न्यूट्रिकॉस्मेटिक्स विभागात पोस्टडॉक्टरल संशोधन केले आहे. गेली अनेक वर्षे त्या विविध बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये तांत्रिक नेतृत्वाच्या भूमिकेत  काम करीत आहेत. सध्या त्या कॅपनोफार्म कंपनीमध्ये जर्मनी येथे मुख्य वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम करीत असून ही अभिमानाची गोष्ट आहे. कॅपनोफार्म ही कंपनी विशेष वैद्यकीय उपकरणे आणि फार्मास्युटिकल औषधे तयार करणारी कंपनी आहे. डॉ.रंजिता यांनी अनेक संशोधन लेख, पुस्तकातील प्रकरणे लिहिली आहेत आणि अनेक राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन पेपर सादर केले आहेत. औषध वितरण आणि लक्ष्यीकरण क्षेत्रात त्यांनी अनेक पेटंट अर्ज दाखल केले आहेत.

त्याशिवाय त्यांनी फार्मास्युटिकल नॅनो टेक्नॉलॉजी या कठीण विषयात औषध वितरण पैलूंच्या क्षेत्रातील अनेक ट्रेंडिंग पुस्तके संपादित केली आहेत. त्यांच्या उच्च संशोधनासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकी अलीकडेच मिळालेला प्रतिष्ठित जर्मन इनोव्हेशन अवॉर्ड, 2022 चा समावेश आहे. कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांनी स्वप्न बघू नये असे काही नाही. स्वप्न जरूर बघावे आणि जिद्दीने पुढे जावे. प्रसिद्ध मराठमोळी शास्त्रज्ञ डॉ. रंजिता आज जागतिक नामवंत शास्त्रज्ञांच्या रांगेत मानाचे स्थान प्राप्त करून तिरंग्याचा मान वाढवीत आहे. फार्मास्युटिकलच्या क्षेत्रामध्ये
पॉलिमेरिक नॅनोपार्टिकल्स, नॅनोक्रिस्टल्स, लिपिड नॅनोपार्टिकल्स, नॅनोइमुलेशन्स, कॅन्सर ड्रग टार्गेटिंग आणि डिलिव्हरी सिस्टममध्ये एक्सिपियंट्सचे संशोधन महत्त्वाचे आहे. कर्करोगावर कोणतेही रामबाण औषध नाही किंवा लसही नाही, परंतु डॉ. रंजिता यांनी संशोधन करून यकृत, गर्भाशय, गुदद्वारासंबंधीचा, घसा, पोटाच्या आणि लिंगाच्या कर्करोगासाठी वापरले जाणारे औषध बनवले आहे. कॅन्सर प्रतिबंधासाठी कारणीभूत काही विषाणूंच्या लसी आहेत, उदा. मानवी
पॅपिलोमाव्हायरस (HPV) आणि हिपॅटायटीस बी या लसी कर्करोगापासून नव्हे, तर विषाणूंपासून संरक्षण करतात. डॉ. रंजिता यांचा रिसर्च वेगवेगळय़ा वयोगटांतील लोकांसाठी आहे. वेगवेगळय़ा रोगांवर त्यांनी संशोधन केले आहे आणि त्यांनी शोधून काढलेले अत्याधुनिक जर्मन टेक्नॉलॉजीयुक्त कॅन्सर औषध आता उपचारांसाठी वापरले जात आहे, सज्ज आहे.

टीमची मुख्य संशोधक म्हणून या शोधाचे सारे नेतृत्व डॉ. रंजिता यांनी केले ही बाब महाराष्ट्रासाठी तसेच देशासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या कंपनीने बनवलेल्या उपकरणाचा आणि औषधाचा वापर जगात सुरू झाला आहे आणि हिंदुस्थानातील काही नामांकित हॉस्पिटलमध्ये, जसे एम्स आणि टाटा रुग्णालयात त्या औषधांचा वापर केला जात आहे. ही कॅन्सर जर्मन थेरपी सर्वत्र उपलब्ध आहे. फार्मसी या क्षेत्रात इतक्या उच्च पदावर कमी वयात पोहोचणारी डॉ. रंजिता ही पहिली हिंदुस्थानी महिला आहे. पुरुषांची मक्तेदारी आणि अफाट स्पर्धा असूनही ती चीफ सायंटिफिक ऑफिसर म्हणून संशोधन करीत आहे. वीसच्या वर पुस्तके लिहिणाऱया डॉ. रंजिता यांची पुस्तकं जगभरातील फार्मसीविषयक पुस्तकांमध्ये बेस्ट सेलर यादीत आहेत.

कॅन्सरवर औषध संशोधनाबद्दल येत्या नोव्हेंबरमध्ये डॉ. रंजिता यांचा मानाचे जर्मन मेडिकल अवॉर्ड देऊन सन्मान होणार आहे. महाराष्ट्राला भूषण वाटेल असे डॉ. रंजिता यांचे कर्तृत्व आहे. सामान्य घरातील असामान्य यश मिळणारी डॉ. रंजिता अनेकांना मार्गदर्शन करते. देश, परदेशात त्यांना मार्गदर्शनासाठी बोलावण्यात येते. अत्यंत मेहनत आणि चिकाटी हे त्यांचे गुण स्फूर्तिदायक आहेत, पण मानवता जपणाऱया डॉ. रंजिता काही एनजीओमार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना मदत करतात हे कौतुकास्पद आहे. डॉ. रंजिता सांगतात, “त्या वेळी बेताची परिस्थिती असून जीवघेणा संघर्ष करण्याचे बळ मला आलेल्या अनुभवाने दिले. काहीतरी वेगळे करावे ही जिद्द होती. मानवतेचा विचार होता. चीफ सायंटिफिक ऑफिसर म्हणून काम करणे अभिमानाचे असले तरी जबाबदारीचे काम आहे. परदेशी बुद्धिवान लोक माझ्या मार्गदर्शनाखाली काम करतात तेव्हा माझ्या मेहनतीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. देशातील विद्यार्थ्यांना एकच सांगणे आहे, परिस्थिती नाही असे म्हणत ध्येय सोडू नका. संघर्ष करा, यश नक्की मिळेल. मला मिळाले, तुम्हाला का मिळणार नाही? विचार करा. मी अत्यंत खडतर प्रवास केला, पण दुसरा मार्गही सापडत नव्हता. पैसे नाहीत, म्हणून मी रडत बसले नाही, तर आहे त्या परिस्थितीत लढा देऊन इथपर्यंत पोहोचली. यश मिळवणे सोपे आहे, पण टिकवणे कठीण आहे. त्यामुळे परिश्रम जरुरी आहे आणि मेहनतीला दुसरा पर्याय नाही. शैक्षणिक मदत मिळावी म्हणून बँकेला माझी डिग्री ठेव म्हणून द्यायला मी तयार होती. कारण हीच माझी संपत्ती होती. दुसरे काहीही माझ्याकडे नव्हते. त्याचमुळे आज गरजू मुलांना मी मदत करते. अनेक खस्ता खात दिवस काढणे कठीण होते, पण आजच्या यशामुळे, माझ्या मेडिसीनमुळे मी जगातील अनेक कॅन्सर रुग्णांना एक जगण्याची आशा देऊ शकते. त्यामुळे मी खूप समाधानी आहे.”

डॉ. रंजिता एचआयव्ही, कॅन्सर आणि इतर रोगांसंबंधित औषधांवर संशोधन करीत असून रुग्णांना नक्कीच आशेचा किरण मिळत आहे. देशाला अशा महिला संशोधकांचे कौतुक आहे. कारण त्यांच्या संघर्षाने, औषधाने त्यांनी कॅन्सर रुग्णांना दिलासा दिला आहे.

वाचकांना त्यांच्या संशोधनाविषयी अधिक माहिती हवी असेल, मार्गदर्शन हवे असेल तर  http://ranjitas.com या लिंकला क्लिक करा.

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची- केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)